अंबरनाथ येथील भाऊसाहेब परांजपे विद्यालयात (पूर्वाश्रमीचे कानसई हायस्कूल) १९८७ मध्ये दहावीला असणाऱ्या विद्यार्थ्यांचे संमेलन रविवारी झाले आणि तब्बल सव्वादोन तपानंतर अनेकांनी मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवलेले आठवणींचे पिंपळपान सळसळले. त्या वर्षी शाळेत दहावी ‘क’ तुकडीत असणाऱ्या प्रिया कारखानीस, सचिन ठाकुरदेसाई, जगदीश हडप, संगीता नाटेकर आदी विद्यार्थ्यांनी या संमेलनासाठी पुढाकार घेतला आणि तब्बल २७ वर्षांनंतर पुन्हा शाळेचा वर्ग भरला. सुरुवातीला दिवंगत मित्र बबन वाघमारे आणि सुनील पापळ यांना श्रद्धांजली वाहून मग गप्पांचा हा वर्ग सुरू झाला.
या संमेलनासाठी पुणे, नाशिक, नगर आदी परिसरांतून शाळूसोबती आले होते. आधी प्रत्येकाने स्वत:ची ओळख करून देतानाच शाळेतल्या आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांची टोपण नावे, शिक्षकांच्या लकबी, मधली सुट्टी आणि ऑफ पिरिअडचे क्रिकेट सामने अशा गप्पांनी संमेलन रंगत गेले. शाळेनंतरच्या मधल्या तब्बल अडीच दशकांहून अधिक काळात कुणी काय केले हे प्रत्येकाने सांगितले. एकमेकांचे ई-मेल्स, मोबाइल्स तसेच घरच्या पत्त्यांची देवाणघेवाण झाली. तब्बल ३५ विद्यार्थी या संमेलनात सहभागी झाले होते. या बॅचची विद्यार्थिनी असणाऱ्या दीपाली कारखानीस हिने अमेरिकेतून ई-मेल पाठवून सोबत्यांना शुभेच्छा दिल्या. आता यापुढे दरवर्षी किमान एकदा संमेलनानिमित्त भेटण्याचा निर्धार या वेळी सर्वच माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.