जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील यशस्वी प्रकल्पांची निवड राज्यस्तरासाठी करण्यात आली असून हे प्रकल्प तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिडको येथील शिक्षण संकुलात आयोजित बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
देशाचा भावी शास्त्रज्ञ तयार करावयाचा असेल तर अशा विज्ञान प्रदर्शनांमधूनच विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम होत असते. त्यामुळे विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वत:ला झोकून द्यावे. ध्येयापासून विचलित न होता विपरीत परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी मनापासून संशोधन करावे, अशी भावना यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचे विभागीय अध्यक्ष डी. जी. जगताप यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक भास्कर सोनवणे, नाशिक पालिकेतील काँग्रेसचे गटनेते लक्ष्मण जायभावे, उपशिक्षणाधिकारी पांडुरंग मगर, पंचायत समिती सदस्य सोपान खालकर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. बी. शिरसाठ, कार्यवाह एस. बी. देशमुख आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी एस. जी. निर्मल यांनी केले. भास्कर सोनवणे, सोपान खालकर, लक्ष्मण जायभावे आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन सुभाष राऊत व अनिल सांगळे यांनी केले. आर.व्ही. शिरसाठ व केशव तुंगार यांनी आभार मानले.