सीसी टीव्ही कॅमेऱ्यामुळे संशयित जेरबंद
सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या दोघा भामटय़ांनी ३४० किलो वजनाचे लोखंडी साहित्य लंपास केल्याचा प्रकार घडला. सीसी टीव्ही कॅमेऱ्यामुळे सुरक्षारक्षकांचे हे प्रताप उघडकीस आले. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.
पी. एम. इलेक्ट्रो या कारखान्यात ही घटना घडली. या ठिकाणी पाच सुरक्षारक्षक वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये कार्यरत होते. त्यातील शब्बीर नवाज शहा आणि साधू सुरेश बोरसे यांनी सुट्टीचा दिवस पाहून कारखान्यातील लोखंडी साहित्य लंपास केले… १ ते २५ ऑगस्ट या कालावधीत १५ हजार रुपये किमतीचे लोखंडी साहित्य गायब झाल्याचे व्यवस्थापनाच्या निदर्शनास आले. या प्रकरणी चारुलता कपूर यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कारखान्यात सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. या कालावधीतील चित्रणाची पोलिसांनी तपासणी केली असता चोरीच्या प्रकारात सुरक्षारक्षकांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शहा व बोरसेला पोलिसांनी अटक केली. कारखान्यात सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन सिक्युरिटी सिस्टीम  या संस्थेमार्फत सुरक्षारक्षकांची नेमणूक झाली होती. सुरक्षारक्षकांनी नियोजनबद्धपणे केलेली ही चोरी सीसी टीव्ही कॅमेऱ्यामुळे उघडकीस आली.