वृत्तांत कॅम्पेन
शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने अनेक योजना महापालिकेतर्फे राबविल्या जात असताना दुसरीकडे मात्र शहराचा वाढता व्याप बघता अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. शहरात आणि विदर्भात पार्किंगची समस्या मोठय़ा प्रमाणात आहे. बाजारपेठा, रुग्णालये, मंगल कार्यालये किंवा हॉटेलमध्ये गेल्यानंतर वाहने कुठे ठेवायची? ही सर्वात मोठी समस्या नागरिकांसमोर उभी ठाकली असून त्यात सुधारणा करण्यासाठी महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्याससह पोलीस दलही हतबल असल्याचे दिसून येत आहे.
शहरात आणि शहराबाहेर गल्लीबोळात आज मोठय़ा प्रमाणात विवाह समारंभासाठी मंगल कार्यालये बांधण्यात आली आहेत. या मंगल कार्यालय परिसरात कुठल्याच सोयी सुविधा नाहीत. मात्र, भाडे वारेमाप आकारले जात आहे. शहरात १९० च्या वर मंगल कार्यालये, ११५ लॉन्स, ७२७ हॉटेल्स आहेत. मात्र, यातील बहुतेक ठिकाणी पार्किंगची सोय नाही. विशेषत: मंगल कार्यालय परिसरात वाहने ठेवण्यास बरीच कसरत करावी लागत आहे. सर्वात जास्त मंगल कार्यालये ेलक्ष्मीनगर झोनमध्ये (२७) तर सर्वात कमी सतरंजीपुरा झोनमध्ये (७)आहेत. हॉटेल सर्वात जास्त धंतोली झोनमध्ये तर सर्वात कमी हनुमाननगर झोनमध्ये (२८) सर्वात जास्त लॉन्स हनुमानगर झोन (३८) तर सर्वात कमी गांधीबाग आणि सतरंजीपुरा (३) झोनमध्ये आहेत. नंदनवनसारख्या वर्दळीच्या भागात २८ मंगल कार्यालय असून त्यातील २५ कार्यालयासमोर पार्किंगची व्यवस्था नाही त्यामुळे विवाह समारंभाला आलेले लोक कुठल्या तरी दुकानासमोर किंवा रस्त्यावर वाहने लावतात. शिवाय या सर्व ठिकाणी फेरीवाले आणि छोटे दुकानदार दुकाने थाटून बसतात त्यामुळे पार्किंगला जागा राहत नाही. अशा परिस्थितीत वाहतूक पोलीस अशा अनधिकृत पार्किंगच्या ठिकाणी गाडय़ा ठेवल्यामुळे त्या घेऊन जात असतात आणि नागरिकांना मानसिक त्रासासोबत आर्थिक भुदर्ंड बसतो.
धरमपेठ, लक्ष्मीनगर, धंतोली, लकडगंज, मंगळवारी नेहरूनगर या झोनमध्ये मोठय़ा प्रमाणात मंगल कार्यालय परिसरात कुठल्याही सोयी सुविधा केल्या नसताना महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास काहीच कारवाई केली जात नाही. हॉटेल्स आणि लॉन्सच्या बाबतीत हीच परिस्थिती आहे. अनेक छोटय़ा मोठय़ा हॉटेल आणि लॉन्ससमोर पार्किंगची व्यवस्था नाही. विशेषत रामदासपेठ परिसरात असलेल्या मोठय़ा हॉटेलसमोर पार्किंगची समस्या आहेत.
शहरात मंगल कार्यालये, हॉटेल्स, रुग्णालयांची वाढती संख्या आणि रस्त्यावरील बेशिस्त वाहतूक आणि अतिक्रमणांमुळे नागपूर शहरात फिरता येण्याजोगी स्थिती राहिलेली नाही. यात सुधारणा होण्याची शक्यता नाही. अधूनमधून थोडीफार शिस्त आणण्याचा प्रयत्न होतो, परंतु ती कारवाई थातुरमातूर असते. वाहतूक पोलीस, आरटीओ मारल्यासारखे करतात आणि वाहनचालक, रिक्षाचालक, फेरीवाले रडल्यासारखे करतात. डायऱ्या भरतात, दंड होतो. पुन्हा बेकायदा वाहतूक करण्यास मोकळे! जनतेने जर ठरवले, तर हा प्रश्न सुटेल. मात्र, त्यासाठी स्वयंशिस्तीचा धडा गिरवायला हवा. म्हणजे पोलीस आणि
संबंधित यंत्रणेशी तुम्हाला भांडता येईल.
नागपूर शहर सर्व दिशांनी वाढू लागले आहे. बाजारपेठाही आडव्या-तिडव्या पसरत आहेत. त्यामुळे वाहनांची वर्दळ वाढते आहे. बेशिस्त वाहनांना आवर घालण्यास वाहतूक पोलीस कमी पडत आहेत. इतवारी, बर्डी, रेल्वे स्थानक, बसस्थानक परिसरात कमालीची बेशिस्त वाहतूक सुरू असते. त्यात प्रामुख्याने ऑटो, स्टार बसेस, सायकल रिक्षांचा समावेश आहे. प्रवाशांना दमबाजी, लुटण्याचा प्रकारही शहरात होतो. वाहतूक पोलीस हे मख्खपणे पाहत असतात. बसस्थानक परिसरात ऑटो आणि सायकल रिक्षा आडव्या-तिडव्या लावलेल्या असतात. बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचाही सुळसुळाट वाढला आहे. फुले मार्केट आणि बाजार समितीमध्ये शेतीमाल घेऊन येणाऱ्या ट्रक्समुळे रेल्वे आणि बसस्थानक रस्त्यावर फेरीवाल्यांमुळे नेहमीच वाहतुकीची कोंडी झालेली असते. हा प्रश्न कधी सुटणार हे कोणालाच माहीत नाही! या कोंडीचे लोण शहरात पसरते आहे. बेशिस्त वाहतुकीबरोबरच मुख्य रस्त्याने कंटनेर, क्रेन यासारखी अवजड वाहने दिवस-रात्र पळत असतात. या वाहनांमुळे कितीतरी अपघात झाले आहेत. अनेकांचे प्राण गेले आहेत. बहुतांश ठिकाणी दुकानदारांनी रस्त्यावर लावलेले सामान, हातगाडय़ा, फळविक्रेते यांचा गराडा असतो. अतिक्रमण हटविण्याची कारवाई रोज शहराच्या वेगवेगळ्या भागात सुरूअसली तरी ती परिणामकारक ठरली नाही.
संग्रहित लेख, दिनांक 26th Apr 2014 रोजी प्रकाशित
शहरात पार्किंगची समस्या गंभीर
शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने अनेक योजना महापालिकेतर्फे राबविल्या जात असताना दुसरीकडे मात्र शहराचा वाढता व्याप बघता अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
First published on: 26-04-2014 at 04:05 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Serious parking problem in the nagpur city