काँग्रेस आघाडीने २०० रुपये, अल्पोपहार व येण्या-जाण्याची व्यवस्था, महायुतीकडून १०० रुपये आणि अल्पोपहारासह वाहतूक व्यवस्था तर मनसेने १०० रुपयात सर्व काही.. शुक्रवारी राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी जोरदार शक्ति प्रदर्शन करताना जमविलेल्या गर्दीसाठी असे भाव मोजल्याचे फेरीत सहभागी झालेल्यांकडून सांगण्यात आले. अर्ज दाखल करण्यासाठीच्या या शक्ति प्रदर्शनात काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराचा भाव सर्वाधिक ठरला तर मनसे आणि शिवसेनेचे भाव तुलनेत कमी ठरले. चोरीछुप्या मार्गाने झालेल्या या आर्थिक व्यवहारांकडे निवडणूक यंत्रणा कशा पध्दतीने पाहणार, याकडे सर्वाचे लक्ष आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आघाडीचे उमेदवार छगन भुजबळ, डॉ. भारती पवार, महायुतीचे हेमंत गोडसे आणि मनसेचे डॉ. प्रदीप पवार यांनी एकाच दिवशी अर्ज भरले. अर्ज दाखल करताना आम्ही कोणापेक्षा कमी नाही हे दर्शविण्यासाठी राजकीय पक्षांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. मात्र, आपली ताकद दाखविण्यासाठी या पक्षांना समर्थकांची दाम मोजून आयात करावी लागल्याचे पहावयास मिळाले. तिन्ही पक्षांच्या फेरींमध्ये प्रामुख्याने महिलांचा सहभाग होता. झोपडपट्टी व कामगार वस्तीतून त्यांना आणण्यात आले होते. त्यातील काही महिला दैनंदिन कामांना दांडी मारून आल्या. या ठिकाणी रोख रक्कम पदरात पडेल आणि एकवेळच्या भोजनाची सोय होईल असे त्यांचे गृहितक होते. तिनही पक्षांनी काढलेल्या फेरीत सहभागी झालेल्या काही महिलांशी चर्चा केली असता काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराने सर्वाधिक भाव दिल्याचे निदर्शनास आले.या फेरींसाठी सहा ते सात दिवसांपासून फुलेनगर, पेठरोड, उंटवाडी, राजवाडा, पंचशीलनगर, कामगार वस्ती आदी भागातील झोपडपट्टय़ांमधून स्वयंघोषित कार्यकर्ते माणसांचा शोध घेत होते. महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हक्काची माणसे म्हणून बचत गटांच्या महिलांना जमा करण्याचे काम सोपविले. दुसरीकडे, युवा वर्गाला गल्ली-बोळातील युवकांना सोबत घेण्याचे सांगण्यात आले. मनसेच्या फेरीत फुलेनगर, पेठरोड परिसरातील बहुतेक गर्दी होती. त्यात काही महिला आपली धुण्या-भांडय़ांची कामे सोडून आल्या होत्या. पेठरोड येथील सिंधुबाई भोर यांनी त्यास दुजोरा दिला. गल्लीतील युवकांनी दीड तासाचे शंभर रुपये आणि थोडेफार भोजन मिळणार असल्याचे सांगितल्याने आपण सहभागी झाल्याचे नमूद केले. परंतु, प्रत्यक्ष फेरीत नुसतीच पायपीट करायला लावून अद्याप पाणी दिले नसल्याची तक्रार त्यांनी केली. पंचवटीतील आशा भामरे आधी कापड दुकानात काम करत होत्या. प्रचारात सहभागी झाल्यास दररोज १०० रुपये मिळणार असल्याने सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. फेरीत सहभागी होण्यासाठी शंभर रुपये फार कमी रक्कम असून मध्येच कार्यकर्ते काही रक्कम लंपास करत असल्याची शंकाही त्यांनी उपस्थित केली.
महायुतीच्या फेरीत अनेक महिला बचत गटाच्या सदस्या सहभागी झाल्या. या शिवाय नुकत्याच दहावी, बारावीच्या परीक्षा देणाऱ्या मुला-मुलींचाही अधिक्याने भरणा होता. या फेरीसाठी अनेकांना सकाळी आठ वाजेपासून घराबाहेर काढण्यात आले. परंतु, पक्ष कार्यालयाच्या आवारात दीड ते दोन तास बसवून ठेवल्याची तक्रार अनेक जणींनी केली. सावतानगरच्या आशा पाटील बचत गटाचे काम करतात. भाऊंना नाही कसे म्हणणार आणि त्यांच्याकडून १०० रुपये व नाश्ता मिळणार असल्याने आणि वाहतुकीची व्यवस्थाही त्यांच्याकडून झाल्याने त्यांनी सांगितले. दहावीची परीक्षा देणाऱ्या नेहा परदेशीला अधिक पैसे मिळतील म्हणून आई फेरीत घेऊन आली. त्यामुळे चक्क साडी नेसून ती फेरीत भगवा झेंडा घेऊन सहभागी झाली होती. फेरीत काही गर्भवतींचाही समावेश होता. डॉक्टरांनी पायी चालायला लावले. त्यामुळे घरी बसण्यापेक्षा फेरीत चालायला आले आणि सायंकाळी डॉक्टरांचे शुल्कही सुटणार असल्याचे एका महिलेने सांगितले. राष्ट्रवादीच्या फेरीत सहभागी झालेल्यांना मनसे व महायुतीच्या तुलनेत दुप्पट रक्कम पदरात पडली. सहभागी झालेल्यांना प्रत्येकी २०० रुपये मिळाल्याचे काही महिलांनी सांगितले. सातपूर येथे बांगडय़ांचा व्यवसाय करणारी महिला फेरीत सहभागी झाली होती. २०० रुपये, चहा, नाश्ता व भोजन मिळणार असल्याने व्यवसाय बंद ठेवून आपण फेरीत सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. फेरी झाल्यावर काँग्रेस आघाडीने यशवंत व्यायामशाळेच्या मैदानावर समर्थकांच्या भोजनाची व्यवस्था केली. होती. पुरी व भाजीच्या पाकिटांचे वाटप झाले. ते घेण्यासाठी मोठी झुंबड उडाली. व्यायामशाळेच्या मैदानावर अस्ताव्यस्तपणे ही पाकिटे पडल्याचे पहावयास मिळाले. बागलाण येथील अशोक भोये यांनी फेरीत सहभागी होण्यासाठी पैसे घेतले नसल्याचे सांगितले. पण, प्रत्येक गाडीसाठी अडिच हजार रुपये घेऊन आपल्या गावातून आठ ते नऊ काळ्या पिवळ्या जीप नाशिकला आल्याचे त्यांनी सांगितले.