नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित मानत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शहरासह ग्रामीण भागातील लहानमोठय़ा कार्यक्रमांना उपस्थित राहात कधीच गाठीभेटींना सुरुवात केली असताना शिवसेनेनेही आता तयारी सुरू केली आहे. शिवसेनेचा उमेदवार अद्याप निश्चित झाला नसला तरी शिवसेनेच्या वतीने विभागनिहाय बैठकींवर भर देण्यात येत आहे. पश्चिम विभागीय शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
पंडित कॉलनीतील बालगणेश फाऊंडेशन येथे ही बैठक झाली. एकूण सात प्रभागांतील विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, प्रभागप्रमुख, शाखाप्रमुख, केंद्रप्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी निवडणुकींच्या संदर्भात युवकांना मतदान प्रक्रियेत सामील करणे, मतदार नोंदणी, मतदार तपासणी, मयत मतदारांची नावे रद्द करण्यासाठी मदत करणे, कार्यकर्त्यांना नवीन मतदार नोंदणीत येणाऱ्या अडचणी, मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता या विषयांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. कोणत्या उपाययोजना करता येतील, तसेच आजच्या युवा पिढीला मतदान प्रक्रियेत सामील करणे, त्यांची जास्तीत जास्त नोंदणी करणे, युवा पिढीला मतदानासाठी प्रवृत्त करणे यांचे मार्गदर्शन मिर्लेकर यांनी कार्यकर्त्यांना केले.
बैठकीला शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, विधानसभा मतदारसंघ प्रमुख महेश बडवे, कार्यालयीन प्रमुख नीलेश कुलकर्णी, उपमहानगरप्रमुख संतोष कहार, शरद देवरे, विभागप्रमुख बाळा कानकेकर आदी उपस्थित होते.