उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेबरोबरच बडय़ा नेत्यांच्या जाहीर सभांना सुरूवात झाल्याने नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील वातावरण निवडणूकमय होऊ लागले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने नाशिक येथे मेळावा तर, वणी येथे जाहीर सभा घेऊन आघाडीतील एकिचे दर्शन घडविले असताना महायुतीत अजूनही पदाधिकाऱ्यांचा योग्य ताळमेळ बसत नाही. ही त्रुटी कशी भरून काढावी, असा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमोर प्रश्न असून उध्दव ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि रामदास आठवले यांच्याखेरीज महायुतीकडे जाहीर सभांसाठी बडय़ा नेत्यांची वानवा असून अशीच स्थिती मनसेची आहे. परंतु आघाडीकडे मात्र शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, आर. आर. पाटील, जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव अशी फौज तयार आहे.
पाऊस आणि गारपीट यांमुळे प्रचाराचा बहुतांश कालावधी उमेदवारांना केवळ व्यक्तीगत गाठीभेटींवर व्यतित करावा लागल्यानंतर आता जाहीर सभांचे पर्व सुरू झाल्याने या सभांच्या माध्यमातून वातावरण निर्मितीसाठी प्रत्येक पक्षाकडून प्रयत्न सुरू आहे. आघाडीकडून नाशिक येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची संयुक्त सभा तर वणी येथे शरद पवार यांची सभा झाली. आतापर्यंत जिल्ह्यात झालेल्या या दोन प्रमुख सभा होय. यानंतरही त्यांच्याकडून वेगवेगळे नेते नाशिक आणि दिंडोरी दोन्ही मतदारसंघात प्रचार सभा घेणार असून नेत्यांची संख्या अधिक असल्यामुळे मतदारंसंघाच्या सर्वच प्रमुख भागांमध्ये सभांचे आयोजन करणे आघाडीला शक्य होणार आहे. महायुतीकडे मात्र गर्दीला भावेल अशा नेत्यांची वानवा आहे. राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांच्यामध्ये रंगलेल्या भाऊबंदकीच्या कलगीतुऱ्यामुळे आणि घरातील घडामोडी त्यांनी थेट चव्हाटय़ावर मांडणे सुरू केल्याने या दोन्ही ठाकरे बंधूंच्या सभांना गर्दी होणार हे साहजिक आहे. परंतु मनसे आणि महायुती दोघांकडेही त्यांच्या व्यतिरिक्त फारसे लोकप्रिय नेते नसल्याने कोणत्या नेत्यांना सभांसाठी बोलवावे हीच चिंता आहे. त्यातल्या त्यात गोपीनाथ मुंडे हे बऱ्यापैकी गर्दी खेचू शकतात. परंतु मुंडे स्वत: बीड मतदारसंघात उमेदवारी करत असल्याने त्यांना इतरत्र अधिक सभा घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्यांच्या जिल्ह्यात किती सभा होतील हे सांगणे सध्या महायुतीच्या स्थानिक नेत्यांना कठीण झाले आहे. या परिस्थितीत उध्दव ठाकरे यांच्या सभेचाच काय तो महायुतीला आधार आहे. उध्दव ठाकरे हे नाशिकमध्ये किती सभा घेतील हे निश्चित नसले तरी त्यांची १८ एप्रिल रोजी गोल्फ क्लब मैदानावर सभा निश्चित झाली आहे. या सभेस पंधरवडा बाकी असल्याने त्याआधीच्या कालावधीत इतर नेत्यांच्या सभा आयोजित करून आव्हान कायम ठेवण्यासाठी महायुतीला प्रयत्न करावे लागतील. पंतप्रधानपदाचे उमेदवार भाजपचे नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन दिंडोरीप्रमाणेच नाशिकमध्ये होण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी संपूर्ण देशातूनच मोदी यांना जाहीर सभांसाठी जबरदस्त मागणी असल्याने त्यांच्या भरगच्च वेळापत्रकात नाशिकसाठी वेळ कसा उपलब्ध होईल, हा प्रश्नच आहे.
मनसे राज्यात मोजक्या जागा लढवित असल्याने आणि नाशिकवर राज ठाकरे यांचे विशेष लक्ष असल्याने या मतदारसंघात त्यांच्या किमान सहा सभा होतील. त्यांच्या सभांची सुरूवात शनिवारी घोटी आणि पवननगर येथील सभांनी होणार आहे. मनसेमध्येही राज यांच्याव्यतिरिक्त सभा जिंकू शकेल असा एकही नेता नाही. त्यामुळे राज यांच्या भोवतीच त्यांचा सर्व प्रचार फिरणारा आहे.