भारतीय जनता पक्षाच्या मांडा-टिटवाळ्यातील दोन गटांच्या वादातून शुक्रवारी येथील व्यापाऱ्यांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवले. त्याचबरोबर रिक्षा, टांगा वाहतूक बंद असल्याने गणपती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे हाल झाले. राजकीय वादाचा नाहक आम्हाला फटका का असा प्रश्न व्यापारी, नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
भाजपचे नगरसेवक बुधाराम सरनोबत यांनी मांडा टिटवाळ्यातील सुमारे ५१ जणांविरुद्ध अनुसूचित जातीजमाती कायद्यांतर्गत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सरनोबत यांच्या दहशतीचा निषेध करण्यासाठी, तसेच या विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी भोर हेही या प्रकरणी निष्पक्षपाती भूमिका घेत नसल्याने पोलिसांच्या कृतीचा निषेध करण्यासाठी हा बंद पाळण्यात आल्याचे नगरसेविका उपेक्षा भोईर व भाजपचे पदाधिकारी ज्ञानेश्वर भोईर यांनी सांगितले. सरनोबत यांच्या कृत्याची माहिती देण्यासाठी आपण पोलीस अधिकारी भोर यांना मुरबाड येथील त्यांच्या कार्यालयात भेटण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्यांनी आपणास भेटण्यास टाळाटाळ केली, असे नगरसेविका भोईर यांनी सांगितले. टिटवाळ्यातील अनधिकृत बांधकामांमधून लाखो रुपयांची मलई पालिका अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये वाटली जात आहे. या वादातून टिटवाळ्यात गेल्या काही महिन्यांपासून तुफान हाणामाऱ्या सुरू आहेत. टिटवाळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गोडबोले हेही या प्रकरणात ताठर भूमिका घेत नसल्याने हा विषय चिघळत असल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले.