एलबीटीच्या निषेधार्थ १० डिसेंबपर्यंत सकाळी १० ते दुपारी १ या दरम्यान व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
एलबीटीविरोधात व्यापाऱ्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात नाराजी आहे. या मुद्दय़ावर व्यापाऱ्यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत विविध मार्गानी आपले आंदोलन चालू ठेवले. दि. १ डिसेंबरपासून सुरु झालेले हे आंदोलन  ते १० डिसेंबपर्यंत सुरु राहणार असून शहरातील सर्व व्यवहार सकाळी १० ते दुपारी १ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळीनंतर व्यवसायात मंदी असते, त्यासाठी या सुट्टीचा लाभही व्यापाऱ्यांना मिळतो आहे. १० डिसेंबरनंतर प्रशासानाच्या विरोधात बेमुदत बंद पुकारला जाणार असल्याची घोषणा व्यापाऱ्यांच्या वतीने करण्यात आली.
 दरम्यान, लातूर महापालिकेच्या वतीने व्यापाऱ्यांनी प्रशासनाशी चर्चा करावी व बंद मागे घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. मात्र, त्यास व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. ‘बंद’ काळात किरकोळ विक्रेत्यांचे व्यवहार मात्र तेजीत आहेत. एरवी किरकोळ विक्रेत्यांना व्यापारासाठी मोकळी जागा मिळत नाही. सकाळच्या काळात ‘बंद’ असल्यामुळे या विक्रेत्यांच्या व्यवहारात चांगलीच वाढ झाली आहे.