आर्थिक उत्पन्न वाढीसाठी शेतक ऱ्यांनी कृषीमाल प्रक्रियेकडे वळावे, असे आवाहन भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. एस. अय्यपन यांनी केले. सेंट्रल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी (सिरकॉट)चे जिनिंग ट्रेनिंग सेंटर आणि भारत-इस्रायल कृषी विकास संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कापूस प्रक्रिया मूल्यवर्धन प्रशिक्षणाचा समारोप झाला. या समारंभात डॉ. अय्यपन बोलत होते.
कापसाची प्रक्रिया करून शेतकऱ्यांना चांगले दर मिळावे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रशिक्षण घेतलेल्या शेतक ऱ्यांच्या पहिल्या तुकडीला डॉ. एस. अय्यपन यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमाला सेंट्रल इन्स्टिटय़ूट फॉर कॉटन रिसर्चचे संचालक डॉ. के.आर. क्रांती, डॉ. बी.जे. शिवणकर, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे संचालक डॉ. दत्ता, डॉ. दीपक सरकार, ‘सिरकॉट’चे संचालक डॉ. एस.के. चटोपाध्याय, डॉ. पी.जी. पाटील, डॉ. एस.के. शुक्ला आणि जी.एच. वैराळे प्रामुख्याने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या पुढील तुकडीला १० ते १५ डिसेंबरदरम्यान प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा, असे आवाहन भारत-इस्रायल कृषी विकास संस्थेचे अध्यक्ष सुनील माणकीकर यांनी केले. कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थी शेतकरी व कृषी शास्त्रज्ञ उपस्थित
होते.