श्रीक्षेत्र पुसेगाव (ता. खटाव) येथील ब्रम्हलीन तपोनिधी सिद्धहस्त योगी परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांचा यंदाचा रथोत्सव सोहळा येत्या १० जानेवारी रोजी साजरा होणार आहे. परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या ६५व्या पुण्यस्मरणानिमित्त दि. ६ ते दि. १५ जानेवारी २०१३ दरम्यान, पुसेगाव येथे वार्षिक  यात्रा मोठय़ा दिमाखात भरविण्यात येणार असल्याची माहिती मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरी महाराज व देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी दिला.
पश्चिम महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, गुजरात व उत्तर कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त १० दिवसांच्या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ६ जानेवारी रोजी मनाचा झेंडा मिरवणुकीने यात्रेस प्रारंभ होईल. दि. ६ व ७ जानेवारी रोजी पुसेगावच्या श्री हनुमानगिरी हायस्कूलच्या मैदानावर अखिल भारतीय दिवसरात्र शूटिंग व्हॉलिबॉल स्पर्धा होणार आहेत. साखळी पद्धतीने होणाऱ्या या स्पध्रेतील विजेत्या प्रथम क्रमांकास २५ हजार व श्री सेवागिरी चषक, द्वितीय क्रमांकास १५ हजार, तृतीय क्रमांक १० हजार, चतुर्थ क्रमांक ५ हजार, पाच ते आठ या क्रमांकाच्या संघांना प्रत्येकी २ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.
दि. ९ जानेवारी रोजी नारायणगिरी महाराज यांच्या ५९व्या पुण्यतिथीनिमित्त कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केले आहे. या आखाडय़ात ५१ रुपयांपासून १ लाख ५१ हजार रुपयांपर्यंतच्या कुस्त्या होणार आहेत. दि १० जानेवारी हा यात्रेचा मुख्य दिवस असून, या दिवशी परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या पादुका व प्रतिमेची फुलांनी व नोटांच्या माळांनी सजविलेल्या रथातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. दि. ९ जानेवारी ते दि. १२ जानेवारी या कालावधीत ‘राज्यस्तरीय सेवागिरी कृषी व पशुपक्षी प्रदर्शन २०१३’ भरविण्यात येणार आहे. दि. ११ व १२ जानेवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजता या वेळेत जिल्हास्तरीय भव्य युवा महोत्सवाचे आयोजन प्रथमच करण्यात येत आहे. दि. १२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता श्वान प्रदर्शन, तर दि. १३ रोजी सकाळी ११ वाजता श्वान स्पर्धा होणार आहेत. यासाठी १०० रुपये प्रवेश
शुल्क घेण्यात येणार आहे. दि. १३ जानेवारी रोजी बक्षीसप्राप्त जनावरांची निवड, तर दि. १५ रोजी बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.
यात्रेकरूंच्या व जनावरांच्या पिण्याची उत्कृष्ट सोय करण्यात आली आहे. यात्रा सुरू होण्यापूर्वी दुकानदारांनी आपल्या जागा १० दिवसांपूर्वी आरक्षित कराव्यात. दि. २८ डिसेंबरपासून जागांचे आरक्षण सुरू होणार आहे, अशी माहिती विश्वस्त मोहनराव जाधव, डॉ. प्र. ल. भुजबळ, शिवाजीराव जाधव, विजय द. जाधव व अॅड. विजयराव जाधव यांनी दिली आहे.