प्रवेशासाठी लागणाऱ्या विविध कागदपत्रांचे साक्षांकन करण्याची मोहीम भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने येथील केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रवेशव्दाराजवळच सुरू करण्यात आली आहे.
महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी सध्या पालक व विद्यार्थ्यांची एकच गर्दी होत आहे. या धावपळीत बहुतेकांना प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती नसते. अर्ज, छायाचित्र, गुणपत्रिका, साक्षांकन प्रती या सर्वाची जमवाजमव करण्यात विद्यार्थी व पालकांचा बराचसा वेळ जात असल्याचे लक्षात घेऊन शिवसेना व भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे सोमवारी केटीएचएम महाविद्यालयात साक्षांकन मोहीम राबविण्यात आली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आ. रवींद्र मिर्लेकर, शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख जयंत दिंडे, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, मनिषा हेकरे, नगरसेवक माणिक सोनवणे आदी उपस्थित होते. मंगळवारपासून नाशिक शहरातील आरवायके, एचपीटी, सिडको, बिटको यांसारख्या महाविद्यालयांमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांमार्फत साक्षांकन मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती अजय बोरस्ते यांनी दिली.