खुद्द शिक्षण मंडळाच्या पथकाला हुसकावून दिल्यानंतरही शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून सिल्व्हर ओक व्यवस्थापनावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी सोमवारी आ. नितीन भोसले यांना साकडे घातले. या मुद्यावरून आ. भोसले यांनी शिक्षण उपसंचालकांना जाब विचारला. शाळेतून काढलेल्या विद्यार्थ्यांना ३ जानेवारी रोजी शाळेत पुन्हा प्रवेश दिला जाणार असल्याचे शिक्षण उपसंचालकांनी म्हटले आहे.
सिव्हर ओक व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या सुमारे १२ मुलांना वर्गात बसण्यास मज्जाव केला आहे. संबंधितांच्या पालकांना शाळेतून काढून टाकण्यात आले. यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या मुलांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. परंतु, आता शुल्क न भरल्याच्या कारणावरून संस्थेने ही कारवाई केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रारही करण्यात आली आहे.
दरम्यानच्या काळात या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महापालिका शिक्षण मंडळाचे पथक गेले. त्यावेळी या पथकाला हुसकावत शाळा व्यवस्थापनाने आपला उद्दामपणा दाखवून दिला. या घटनाक्रमाविषयी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने अहवाल मागवून घेत कारवाईचे संकेत दिले होते. परंतु, अद्याप तशी कोणतीही कारवाई झालेली नाही. हा तिढा सुटत नसल्याने शाळेतून काढलेल्या विद्यार्थ्यांची हुतात्मा स्मारकात प्रतिकात्मक शाळा भरविली जात आहे. काही दिवसांपूर्वी या विद्यार्थी व पालकांना आंदोलनासही परवानगी नाकारली गेली. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पां. भा. करंजकर यांनी आ. नितीन भोसले यांच्याशी संपर्क साधून हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली.
आ. भोसले यांनी हुतात्मा स्मारकात भेट देत विद्यार्थी व पालकांशी चर्चा केली. शाळा व्यवस्थापन जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना त्रास देत आहे. शिक्षण विभागाकडून कोणतीही पावले उचलली जात नसल्याची व्यथा यावेळी मांडण्यात आली.
आ. भोसले यांनी त्वरित शिक्षण उपसंचालक तुकाराम सुपे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी ३ जानेवारी रोजी संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याचे मान्य केले. त्यावेळी आपणही शाळेत उपस्थित राहणार असल्याची ग्वाही भोसले यांनी दिली. या बाबतची माहिती करंजकर यांनी दिली.