दिल्लीतील दोन भाविकांनी चांदीचा चौरंग व दोन पाट गुरुवारी साईचरणी अर्पण केले. सुमारे ३३ किलो चांदी वापरुन बनविण्यात आलेला हा चौरंग व पाटाची किंमत साडेसतरा लाखांपर्यंत आहे. उद्या (रविवार) विजयादशमी व साईंच्या पुण्यतिथीदिनापासून या वस्तू नित्यपूजेत वापरण्यात येणार आहेत.
साईबाबांची दर गुरुवारची पालखी निघण्यापूर्वी दिल्लीचे भाविक ब्रिजलाल खदरीया व प्रकाशचंद मित्तल यांनी हा चांदीचा चौंरग व पाट उपविभागीय अधिकारी तथा संस्थानचे कार्यकारी आधिकारी अजय मोरे यांच्याकडे सुपूर्द केले. तहसिलदार तथा उपकार्यकारी अधिकारी आप्पासाहेब िशदे, मंदिर प्रमुख रामराव शेळके आदी यावेळी उपस्थित होते. नाशिक येथील बाफना ज्वेलर्स यांच्याकडे हा चौरंग व पाट बनवण्यात आला आहे. चौरंगावर कलश असलेली महिरप असून या सर्व वस्तूंवर सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे. खंदरीया यांनी यापूर्वी साईंना चांदीची घंटा अर्पण केली आहे. साई मंदिरात सध्या पूजेला वापरण्यात येत असेलला चांदीचा चौरंग व पाट सन १९६० मध्ये साली बनविण्यात आला होता.