देशविदेशांतील परिवहन सेवेचा अभ्यास करून त्यातील चांगल्या गोष्टी आपापल्या राज्यांत लागू करता याव्यात, यासाठी देशभरातील राज्य परिवहन महामंडळांच्या परदेश दौऱ्यात यंदा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे ‘खोगीरभरती’ केली असल्याचे स्पष्ट होत आहे.
एसटीतर्फे सहा जण या दौऱ्यासाठी जाणार असून त्यात माजी उपाध्यक्षांसह लहानपणापासून मैत्रीपूर्ण संबंध असलेला एक अधिकारी, परिवहन खात्याचे सचिव आणि राजकीय व्यवस्थेतून एसटीवर नेमण्यात आलेल्या अध्यक्षांचा समावेश आहे. एसटीच्या कार्यशाळेत गाडय़ा बांधण्याचे तंत्रज्ञान जुनाट असूनही त्या कार्यशाळेच्या अधिकाऱ्यांसह अनेक महत्त्वाच्या खात्यांच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना डावलण्यात आले आहे.
‘असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग’ या सर्व राज्यांच्या एसटी महामंडळांच्या मातृसंस्थेतर्फे दरवर्षी एक परदेश अभ्यासदौरा काढला जातो. यंदा हा दौरा फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया-न्युझीलंडमध्ये जाणार होता. मात्र काही कारणाने दौऱ्याचे स्थळ आणि वेळही बदलली.
आता हा दौरा २८ एप्रिल रोजी मेक्सिको आणि सॅनफ्रान्सिस्को येथे जाणार आहे. या दौऱ्यात महाराष्ट्र एसटी महामंडळातर्फे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष जीवनराव गोरे, परिवहन सचिव शैलेश शर्मा, माहिती तंत्रज्ञान अधिकारी जयंत बामणे, मुख्य सांख्यिक संजय गांजवे आणि वाहतूक खात्याचे महाव्यवस्थापक सूर्यकांत अंबाडेकर यांचा समावेश आहे.
या दौऱ्याचा हेतू पाहता मुख्य सांख्यिक अधिकारी, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, एसटीचे अध्यक्ष आणि परिवहन सचिव यांचा समावेश या दौऱ्यात कसा करण्यात आला, याचे कोडे एसटीतील भल्या भल्या अधिकाऱ्यांना पडले आहे. एसटीच्या अध्यक्षांना एसटीच्या दैनंदिन कामकाजाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार नसतात.
अध्यक्ष राजकीय व्यवस्थेतून एसटी महामंडळावर नियुक्त झाला असल्याने त्यांच्या या दौऱ्यातील समावेशाबाबत प्रश्नचिन्ह आहे. मुख्य सांख्यिक गांजवे व माजी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विकास खारगे हे वर्गमित्र असल्याचे समजते. त्याचप्रमाणे याबाबतचा ठराव २८ फेब्रुवारी रोजी एसटीच्या संचालक मंडळात मंजूर झाला, त्या वेळी खारगे व गोरे हे दोघेच त्या बैठकीला उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
एसटीचे संकेतस्थळ २००६मध्ये सुरू झाले. मात्र त्यानंतर या संकेतस्थळात काडीचाही बदल झालेला नाही. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान विभागाचा अधिकारी या दौऱ्यात जाऊन काय वेगळे शिकणार आहे, असा प्रश्न एसटीतील काही अधिकाऱ्यांना पडला आहे. विशेष म्हणजे या दौऱ्याबाबतचा ठराव वितरित करताना ही सहाही नावे गुलदस्त्यातच ठेवण्यात आली होती. त्यामुळे आता या ठरावाच्या हेतूबाबतच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
याबाबत कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना विचारले असता, त्यांनी या प्रस्तावाला विरोध केला. अध्यक्ष आणि परिवहन सचिव यांचा या दौऱ्यात कसा समावेश होऊ शकतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मात्र या प्रकरणी अध्यक्ष जीवनराव गोरे व परिवहन सचिव शैलेश शर्मा यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
संग्रहित लेख, दिनांक 11th Apr 2014 रोजी प्रकाशित
एसटीच्या ‘अभ्यासदौऱ्या’साठी ‘मित्रा’ची वर्णी
देशविदेशांतील परिवहन सेवेचा अभ्यास करून त्यातील चांगल्या गोष्टी आपापल्या राज्यांत लागू करता याव्यात, यासाठी देशभरातील राज्य परिवहन महामंडळांच्या परदेश दौऱ्यात यंदा महाराष्ट्र
First published on: 11-04-2014 at 12:31 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St former chiefs friend on study tour st