राज्यात नवरात्रोत्सवाची सांगता शांततेत होत असताना ऐरोलीसारख्या एका छोटय़ा उपनगरात देवी विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान चांगलाच तणाव निर्माण झाला होता. अखेर रबाळे पोलिसांनी राज्य राखीव दलाच्या तुकडीला दोन नवरात्रोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये भिंतीसारखे उभे केल्यानंतर पाऊण तासाने हा तणाव काहीसा निवळला आणि ऐरोलीकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
तणाव आणि ऐरोली असे एक समीकरण काही वर्षांपासून नवी मुंबईत तयार झाले आहे. नवी मुंबईत सिडकोने वसवलेली १४ छोटी-मोठी उपनगरे व २९ गावे, ४१ झोपडपट्टय़ा आहेत. तेथील कारभार कमीअधिक प्रमाणात शांततेत सुरू असताना ऐरोलीसारख्या उपनगरात अशांततेचा लाव्हा रस अधूनमधून उफाळून वर येत असतो. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या तथाकथित कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर ऐरोलीतील वातावरण काही काळ तंग झाले होते. रविवारी देशभरात देवीचे विसर्जन मोठय़ा धुमधडाक्यात आणि उत्साहात होत असताना ऐरोली सेक्टर-८ येथील रायकर चौकात रात्री दहाच्या सुमारास तणावाच्या वातावरणाला सुरुवात झाली होती.
या चौकात शिवसेनाप्रणीत नवरात्रोत्सवातील देवी विसर्जनाची मिरवणूक आल्यानंतर या ठिकाणी राष्ट्रवादीच्या करण मित्र मंडळाचा गरबा सुरू होता. त्यामुळे या चौकात शिवसेनेनेच्या देवी मिरवणुकीचा मुक्काम वाढला. देवी विसर्जनाच्या अग्रभागी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या मंडळाची देवी होती. त्या मिरवणुकीच्या मागे इतर दोन शिवसेनाप्रणीत मंडळांच्या देवींची मिरवणूक येत होती. त्यामुळे कार्यकर्त्यांची संख्या जास्त होती. त्यात एका कंटेनरवर डी. जे. ऑर्केस्ट्राची व्यवस्था केल्याने गाण्यांचा अक्षरश: दणदणाट सुरू होता. मैं हू डॉन या गाण्याने तर धुमाकूळ घातला होता. गाण्याचा आवाज, त्यात कार्यकर्त्यांचा उत्साह, भगव्या झेंडय़ाचे फडकणे यामुळे समोरच्या राष्ट्रवादीप्रणीत मंडळाच्या कार्यकर्त्यांना डिवचल्यासारखे झाले. त्यामुळे त्यांच्या गरबाचा आवाज चढला. या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक एम. के. मढवी आहेत.
मढवी आणि चौगुले यांचे सख्य नवी मुंबईत सर्वपरिचित आहे. तिकडे डीजे ओरडत असल्याचे बघून या मढवी यांनीही माईक हातात घेऊन ओरडण्यास सुरुवात केली. त्यामुळे कार्यकर्त्यांना चेव सुटला. ऐवढा वेळ शांतपणे बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांनी मग कडक भूमिका घेण्याचे ठरविले.
रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख गोरजे यांनी जवळच उभ्या असणाऱ्या एसआरपीच्या गाडीतील जवानांना खाली उतरण्याचे आदेश दिले. मिरवणूक व गरबा कार्यकर्त्यांच्या मध्ये पोलिसांची एक भिंत उभी करण्यात आली. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार झाला नाही. थोडय़ा वेळाने मिरवणूक पुढे सरकली आणि रहिवाशांच्या चेहऱ्यावरील तणाव मावळला. हा तणाव निर्माण होण्यापूर्वी रस्त्यावर उभारण्यात आलेल्या कमानीमुळे तणाव निर्माण झाला होता. त्यात गोरजे व प्रभाग अधिकारी बाळकृष्ण पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मिरवणुकीला अडथळे ठरू पाहणाऱ्या कमानींची उंची कमी करण्यात आली. त्यामुळे मिरवणूक आणि रात्री उशिरापर्यंत चाललेला गरबा सुरळीत पार पडला.