गेल्या काही वर्षांपासून अपेक्षित पाऊस होत नाही. त्यामुळे उसाचे क्षेत्रही वाढले नाही. यंदाचा गळीत हंगाम अनेक अडचणींतून मार्ग काढत आहे. मात्र, मांजरा परिवारातील सर्व कारखाने समन्वय साधून हा हंगामही यशस्वी करतील, असा विश्वास विकास सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला.
निवळी येथील विकास कारखान्याच्या १३ व्या गळीत हंगामास प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार वैजनाथ िशदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष एस. आर. देशमुख, मांजरा कारखान्याचे अध्यक्ष धनंजय देशमुख, उपाध्यक्ष जगदीश बावणे, रेणा कारखान्याचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, जि. प. चे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, विकास कारखान्याचे उपाध्यक्ष विजय देशमुख आदी उपस्थित होते. आमदार देशमुख म्हणाले की, मांजरा परिवारातील साखर कारखान्यांच्या गाळप क्षमतेएवढा ऊस कारखाना कार्यक्षेत्रात नसल्यामुळे यंदा कार्यक्षेत्राबाहेरील ऊस आणावा लागणार आहे. हे करताना समन्वय व सकारात्मक स्पर्धा करण्याच्या हेतूनेच काम केले जाईल. कोणतीही कटुता न आणता गाळप हंगाम यशस्वी होईल.
मांजरा परिवारातील कारखाने शेतकऱ्यांच्या उसाला सर्वाधिक भाव देत आले आहेत. आगामी काळातही मराठवाडा व विदर्भात उसाला सर्वाधिक भाव देण्याची भूमिका परिवारातील कारखान्यांची राहणार असल्यामुळे ऊस दराबाबत राज्यभर सुरू असलेले आंदोलन मांजरा परिवारातील कारखान्यांना लागूच होत नाही, अशी टिप्पणी आमदार देशमुख यांनी केली. कार्यकारी संचालक एस. डी. बोखारे, सरव्यवस्थापक आर. बी. माने आदी उपस्थित होते.