विदर्भात अतिवृष्टीपेक्षा जास्त नुकसान परतीच्या पावसाने केले आहे. जवळपास १० लाख एकरमधील सोयाबीन व कापसाचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकार मात्र अजूनही झोपते असून प्रशासनाकडून कोणतेही पाहणीचे आदेश देण्यात आलेले नाहीत. विदर्भात विजयादशमी सणादरम्यान आठ शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
प्रथम अतिवृष्टीने कापूस, सोयाबीन व धान पीक नष्ट केल्यानंतर ऑक्टोबरच्या सुरुवातीला झालेल्या परतीच्या पावसाने हातात आलेले सोयाबीन व कापसाचे १० लाख एकरातील पिकांचे अधिक नुकसान केले आहे. राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी घोषित केलेल्या २ हजार कोटी रुपयांच्या मदतीतून एकही पैसा अद्याप मिळालेला नाही. दरम्यान, केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी ११ सप्टेंबरला एक महिन्यात शेतक ऱ्यांना मदत देण्याची घोषणा केली होती, परंतु दमडीही न मिळाल्यामुळे विजयादशमीच्या सणादरम्यान विदर्भात आठ शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्या. यामध्ये शेषराव जाधव (किन्ही, यवतमाळ), अशोक कोरडे (दाभा, यवतमाळ), भगवान गटकळ (भरजहागीर, वाशीम), कवडू आसवले (देऊरवाडा, चंद्रपूर), सुनील तागडे (अंतरगाव, यवतमाळ), नारायण जक्कूलवार (राजापेठ, यवतमाळ), सुरेश चिंचुलकर (कोरा, वर्धा), लक्ष्मण कुसराम (पिपरड, यवतमाळ) यांचा समावेश आहे. हे सर्व शेतकरी सरकारच्या उदासीनतेचे बळी ठरले असून सरकाने विदर्भात कोणतीही अट न घालता सरसकट १० हजार कोटींची मदत द्यावी, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केली आहे.
सुरुवातीलाच अतिवृष्टीने विदर्भात ५० टक्के कापूस व सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते. उर्वरित सोयाबीनला शेंगा व कापसाला बोंडे फुटल्याने शेतक ऱ्यांना आशा निर्माण झाली होती. परंतु परतीच्या पावसाने या पिकांचे नुकसान केले. विदर्भात ४२ लाख हेकरातील खरिपाच्या पिकांना पावसाचा फटका बसला आहे. प्रशासन खोटे अहवाल देत आहे. सरकारनेही शेतक ऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. कृषी मंत्री पवार विदर्भातील पूरग्रस्त भागाचा दौरा करून महिनाभरात मदत मिळेल, असे सूतोवाच करतात, मात्र प्रत्यक्षात शेतक ऱ्यांना काहीच मिळाले नाही.