पाचव्या दिवशी  ७६८ प्रकरणांचा निपटारा
फिरत्या लोकअदालतीने पाचव्या दिवशी ७६८ प्रकरणांचा निपटारा केला. मध्यवर्ती कारागृहात तीस प्रकरणे सामंजस्याने सोडविली. न्यायालयात कैद्यांना त्यांच्या मुलभूत अधिकाराबाबत माहिती देण्यात आली.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुभाष मोहोड हे लोकअदालतीच्या चमूसह कारागृहात गेले. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एन. एच. जाधव, अ‍ॅड. प्रदीप अग्रवाल यांनी कैद्यांना मार्गदर्शन केले. मुख्य न्यायदंडाधिकारी आर. एन. पांढरे यांनी कैद्यांचे हक्क व जामिनासंबंधीच्या कायद्यांची माहिती दिली. कारागृहातील तीस प्रकरणे सामंजस्याने सोडविण्यात आले. खिसे कापल्याप्रकरणी मागील पाच महिन्यांपासून कारागृहात एक आरोपी होता. फिर्यादीने फिरत्या लोक न्यायालयाच्या चमूसमोर आरोपीला माफ केले, असे सांगितले आणि प्रकरण सामंजस्याने संपुष्टात आले.
आरोपीची लगेचच कारागृहातून सुटका झाली. रायपूरला जाण्यासाठी त्याच्याजवळ पैसे नव्हते. त्यामुळे मानवाधिकार परिषदेच्या सदस्यांनी त्याची रायपूरला जाण्याची व्यवस्था करून दिली. चोरीच्या बऱ्याच प्रकरणांत समझोता घडून आला आणि फिरत्या लोक न्यायालयासमोर फिर्यादी व आरोपी दोघांनाही दिलासा मिळाला. जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव किशोर जयस्वाल यांनी कैद्यांच्या बरॅकित जाऊन मानवाधिकाराचे उल्लंघन होत आहे अथवा नाही, याची शहानिशा केली. कारागृहाचे अधीक्षक विनोद शेकदार त्यांच्यासोबत होते.
फिरते लोक न्यायालय त्यानंतर हिंगणा टी पॉइंट येथे गेले. तेथे शेकडो दिवाणी व फौजदारी प्रकरणे निकाली निघाली.  एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतुल नवगिरे व वाहतूक निरीक्षक एस. पी. शिंदे यांनी याकामी मदत केली. सावरकरनगर चौकातही फिरते न्यायालय गेले. पाचव्या दिवशी एकूण ७६८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
 सेवानिवृत्त न्यायाधीश डब्लु. व्ही. गुघाणे, मुंबई उच्च न्यायालयच्या नागपूर खंडपीठाचे व्यवस्थापक अरविंद रोही व उपव्यवस्थापिका भारती काळे, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या सदस्या छायादेवी यादव, नामदेव गव्हाळे, फिलोमिना पिचापल्ली हे वकील, विधि महाविद्यालयाचे पाच विद्यार्थी यांनी याकामी सक्रिय सहकार्य केले.