जिल्ह्य़ात दिवसेंदिवस तीव्र होऊ लागलेल्या पाणीटंचाईमुळे टँकरची मागणी वाढू लागली आहे. काही गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
दरम्यान, प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून ज्या गावांना पाणीपुरवठा होतो, त्या ग्रामपंचायतींकडे ब्लिचिंग पावडर नाही. जिल्ह्य़ातील चार प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी ३४ लाख ५१ हजाराच्या निधीची मागणी जीवन प्राधिकरणने केली. सिद्धेश्वर योजनेच्या दुरुस्तीसाठी १० लाखांच्या निधीस जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली. चार प्रादेशिक योजनांमधून ज्या गावांना पाणीपुरवठा होत नाही, त्या गावांची अवस्था बिकट आहे. जिल्ह्य़ात मंजूर १४४ विंधनविहिरींपैकी १०२ विहिरींचे काम पूर्ण झाले. ८५ विहिरींना पाणी लागल्याची नोंद आहे. भारत निर्माण व जलस्वराज्य अंतर्गत २८ गावांतील नळयोजना दुरुस्तीला ४४ लाख ६६ हजारांच्या निधीखर्चाला मंजुरी मिळाली. आजपर्यंत पाणीपुरवठा योजनेवर २ कोटी ३४ लाखांचा खर्च झाला आहे.