भरत त्यागी खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार नगरसेवक संजय तेलनाडे याचा भाऊ सुनील शंकरराव तेलनाडे याला गुरुवारी येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने मिरज बसस्थानक परिसरात अटक केली. सुनील तेलनाडे याच्यासह त्यागी खूनप्रकरणात एकूण १४ जणांना अटक करण्यात आली आहे.
गुंड त्यागी याचा जयसिंगपूर येथे भरदिवसा गोळय़ा झाडून खून करण्यात आला होता. तेव्हापासून गुन्हय़ाचा मास्टरमाइंड नगरसेवक संजय तेलनाडे व त्याचा भाऊ सुनील तेलनाडे हे दोघेजण फरारी होते. पोलिसांनी तपास करताना दहाजणांना अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीतून तेलनाडेबंधूंचे नाव पुढे आले होते. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास चालवला होता. गेल्या आठवडय़ात संजय तेलनाडे याला बेंगलोर येथे अटक केली होती. तर आज सुनील तेलनाडे हा मिरज येथे पोलिसांच्या हाती लागला. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सयाजी गवारे व सहकाऱ्यांनी केली.