* परीक्षा केंद्रे – ६५२     * एकूण विद्यार्थी -२ लाख ६ हजार ७७३   * संवेदनशील केंद्रे – ४८
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला उद्या, शनिवारी सुरुवात होत असून मंडळातर्फे संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. बारावीप्रमाणेच दहावीच्या परीक्षा केंद्रांवर कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यावर मंडळाने विशेष भर दिला असून प्रत्येक जिल्ह्य़ासाठी सात भरारी पथके आणि संवेदनशील केंद्रावर बैठक पथकाची व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूर विभागीय मंडळात ६५२ परीक्षा केंद्रांवर २ लाख, ६ हजार, ७६६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, त्यात पुनर्परीक्षार्थी २७ हजार, ७५४ तर १ हजार ७५५ विद्यार्थी खासगी परीक्षार्थी आहेत. ४८ केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली असून या केंद्रांवर विशेष बंदोबस्त लावण्यात आल्याची माहिती मंडळाचे नागपूर विभागीय अध्यक्ष चंद्रमणी बोरकर यांनी दिली.
२ लाख, ६ हजार, ७७३ विद्यार्थ्यांपैकी १ लाख, ०६ हजार, ५६ विद्यार्थी व १ लाख ७१७ विद्यार्थिनींचा समावेश आहे. भंडाऱ्यातून २३ हजार, ९५३, चंद्रपूरमधून ३८ हजार, ३३३, नागपूरमधून ७७ हजार, ६७०, वध्र्यामधून २३ हजार ५१६, गडचिरोलीमधून १७ हजार, ४४८ तर गोंदियामधून २५ हजार, ८४३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा देणाऱ्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे.  
विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी मंडळाने काही योजना आखल्या आहेत. अपंग विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सवलतीसाठी अर्ज देणे आवश्यक आहे.
दहावीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी नागपूर विभागीय मंडळात परीक्षा मंडळातर्फे विशेष भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. एकंदर ६० भरारी पथके राहणार असून मंडळाची चार आकस्मिक पथके परीक्षेच्या दिवसात काम पाहणार आहेत.   न्यायालयाच्या आदेशानुसार अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांना गणित विषयांसाठी कॅलक्युलेटर वापरता येतील.
परीक्षेदरम्यान मोबाईलचा वापर करण्यावर बंदी आणण्यात आली असून त्याचा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे बोरकर यांनी सांगितले. परीक्षेच्या काळात होणारे गैरप्रकार बघता काही संवेदनशील केंद्रांवर व्हिडिओ चित्रण करण्याचा मंडळाचा प्रयत्न राहणार आहे. कॉपी पुरविणे किंवा विद्यार्थ्यांना कॉपीसाठी मदत करणाऱ्या शिक्षकांवर व संबंधित केंद्र अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
प्रवेशपत्र, वेळापत्रक, बैठक व्यवस्था आदींबाबतच्या शंकांचे निवारण करण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष ‘हेल्पलाईन’ कार्यान्वित केली आहे. नागपूर आणि अमरावती विभागीय मंडळाचे ‘हेल्पलाईन’चे क्रमांक पुढीलप्रमाणे –  नागपूर- ०७१२- २५५३५०३, अमरावती- ०७२१- २६६२६०८.

नागपूर विभागीय मंडळांतर्गत ४८ संवेदनशील केंद्र आहेत. या केंद्रावर बैठे पथकाची व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूरमध्ये १०, गोंदिया ११, भंडारा चंद्रपूर १६, वर्धा ४, गडचिरोली ५ अशी संवदेनशील केंद्रे आहेत. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात सामूहिक कॉपीचे प्रकार उघडकीस आले. या परीक्षेतही कॉपीचे प्रकार उघडकीस आल्यास केंद्र बंद करण्यात येईल आणि शाळांची मान्यतासुद्धा रद्द करण्यात येईल, असा इशारा मंडळाने दिला आहे. यंदा परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी काही विशेष भरारी पथके तयार करण्यात आली असून ती पथके सूचना न देता केंद्रावर पोहोचतील.  एका वर्गात ५ पेक्षा अधिक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले तर विद्यार्थ्यांसोबत पर्यवेक्षकाविरुद्ध कारवाई केली जाणार आहे.