स्थानिक संस्था कर (एलबीटी) विरोधात ठाणे व्यापार उद्योग महासंघाने सोमवारी पुकारलेल्या बंदला शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एरव्ही शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवरील दुकाने गर्दीमुळे गजबजलेली असतात. मात्र, या बंदमुळे सर्वच ठिकाणी शुकशुकाट पसरला होता. मात्र, शहरातील वाहतूक आणि जनजीवन सुरळीतपणे सुरू होते. दरम्यान, ठाण्यातील व्यापाऱ्यांनी ठाणे महापालिकेवर मोर्चा काढून आपल्या विविध मागण्यांचे निवेदन आयुक्तांना सादर केले.
राज्य शासनाच्या आदेशानुसार ठाण्यामध्येही स्थानिक संस्था कर लागू करण्यात आला असून त्यास व्यापाऱ्यांकडून विरोध होऊ लागला आहे. या करामधील अनेक अटी आणि दर जाचक असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच हा कर लागू करताना महापालिकेने विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करत ठाणे व्यापारी उद्योग महासंघाने सोमवारी बंद पुकारला होता. त्यानुसार, सोमवार सकाळपासूनच शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून स्थानिक संस्था कराविरोधातील आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शहरातील ठाण्यातील पाचपाखाडी, राममारुती रोड, गोखले रोड, मुख्य बाजार पेठा तसेच अन्य महत्त्वाच्या रस्त्यांवरील दुकानांमध्ये नेहमीच गर्दी असते. मात्र, सर्वच दुकाने बंद असल्याने महत्त्वाच्या रस्त्यांवरही सकाळपासूनच शुकशुकाट पसरला होता. असे असले तरी शहरातील जनजीवन आणि वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे सुरू होती.
शहरातील काही छोटय़ा दुकानदारांनी आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी अर्धवट शटर उघडे ठेवल्याचे चित्र दिसत होते. तसेच शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये भाजी, खाद्यपदार्थ आदी विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांनी आपला दैनंदिन व्यवहार सुरूच ठेवला होता. त्यामुळे शहरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. त्याचप्रमाणे शहरातील अत्यावश्यक सेवा सुरळीतपणे सुरू होती. दरम्यान, शहरातील व्यापाऱ्यांनी गावदेवी मैदान ते महापालिकेपर्यंत मोर्चा काढून एलबीटीविरोधी घोषणा दिल्या. तसेच व्यापारांच्या प्रतिनिधींनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन आयुक्तांना सादर केले. या मोच्र्यात मोठय़ा प्रमाणावर व्यापारी सहभागी झाले होते, त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने ती दूर करताना वाहतूक पोलिसांची तारांबळ उडाली होती.