लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दुसऱ्या व अंतिम टप्प्यास प्रारंभ झाला असून विदर्भातील रणरणत्या उन्हात विविध उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांचा कस लागणार आहे. याच आठवडय़ात सोनिया गांधींसह विविध राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांचे धावते दौरे होणार आहेत.
लोकसभेसाठी विदर्भातील मतदारसंघात विविध राजकीय पक्षांच्या व अपक्षांच्या उमेदवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह प्रचारास प्रारंभ केला. उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या क्षणाला उमेदवारी निश्चित झाल्याने काहींना प्रचारास केवळ फारतर अठरा दिवसच मिळणार आहेत. काही उमेदवारांनी त्याआधीच प्रचार सुरू केल्याने त्यांना भरपूर वेळ मिळाला. तरीदेखील निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती झाल्यानंतर प्रचारास खऱ्या अर्थाने रंग चढला. मैदानात विरोधी उमेदवार उतरल्यानंतरच आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.
उमेदवारांनी गेल्या काही दिवसांपूर्वी प्रचारास धडाक्यात सुरुवात केली. नागपूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे नितीन गडकरी, यूपीएचे विलास मुत्तेमवार, आपच्या अंजली दमानिया, बसपचे डॉ. मोहन गायकवाड व इतर उमेदवारांनी शहराच्या विविध भागात तसेच रामटेक लोकसभा मतदारसंघातही महायुतीचे कृपाल तुमाने, यूपीएचे मुकुल वासनिक, बसपच्या किरण पाटणकर, आपचे प्रताप गोस्वामी यांच्यासह इतर उमदेवारांनी गावोगावी संपर्क यात्रांचा धडाका लावला आहे. संपर्क यात्रांनी मतदारसंघ पिंजून काढावयास प्रारंभ केला आहे. मुख्य वाहनात किंवा पायी गळ्यात हार घातलेला व हात जोडून अथवा हात दाखवून अभिवादन करणारा उमेदवार, त्याच्या शेजारी इतर नेत्यांची गदी, सोबतीला पक्षाचे झेंडे लागलेली दुचाक्या व इतर वाहनांवर कार्यकर्ते असे दृश्य विविध भागात दिसू लागले आहे. ‘..आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘वारे. आगया.’ आदी घोषणा रोज मतदारांच्या कानी पडत आहे. रोज एका नेत्याची संपर्क यात्रा मतदार त्याच्या गल्लीत पाहू लागले असून ‘तारे जमीनपर’चा सुखद क्षण नागरिकांना अनुभवास मिळत आहे.
याशिवाय रोज विविध भागात बैठका, मेळावे, जाहीर सभा घेतल्या जात आहेत. पक्षांच्या भूमिका समजावून सांगितल्या जात असून आरोपांच्या फैरी झडत आहेत. विदर्भात नरेंद्र मोदी, राहुल गांधी, शरद पवार, मायावती, अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणआदी नेत्यांच्या जाहीर सभा झाल्या. महायुतीचे नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर, मध्य प्रदेशचे मंत्री कैलास विजयवर्गीय, दिव्या दत्ता, नवज्योतसिंग सिद्धू, मुक्तार अब्बास नकवी तसेच विलास मुत्तेमवार, सागर मेघे व मुकूल वासनिक आदी यूपीए उमेदवारांच्या प्रचारासाठी हुसेन दलवाई आले होते.
निवडणुकीतील महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे मतदान १० एप्रिल रोजी होणार असून ८ तारखेला सायंकाळी पाच वाजता प्रचाराचा धुराळा थांबवावा लागणार आहे. त्यामुळे प्रचाराच्या अंतिम टप्प्यास आता प्रारंभ झाला आहे. प्रचारास आता केवळ आठ दिवसच हाती असल्याने उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे. विविध राष्ट्रीय नेत्यांच्या सभा होणार आहेत. पाच तारखेला सोनिया गांधी येणार असल्याचे हुसेन दलवाई यांनी सांगितले. खासदार हेमामालिनी येणार आहेत. नागपुरात त्यातच नागपूरसह विदर्भात उन्हाळ्यास सुरुवात झाली असून चाळीस अंशापर्यंत पारा भिडला आहे. रणरणत्या उन्हात विविध उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांचा कस लागणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Apr 2014 रोजी प्रकाशित
प्रचाराच्या अंतिम टप्प्यात उमेदवार व कार्यकर्त्यांचा कस
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दुसऱ्या व अंतिम टप्प्यास प्रारंभ झाला असून विदर्भातील रणरणत्या उन्हात विविध उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांचा कस लागणार आहे.

First published on: 01-04-2014 at 08:14 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The final phase of the election campaigninig