अप्पर वर्धा प्रकल्पातून सिंचनासाठी पाण्याची मागणी नाही, हा सरकारी यंत्रणांचा तक्रारीचा सूर शेतकऱ्यांनी खोटा ठरवला असून २०१२-१३ या वर्षांत खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात सुमारे ३४ हजार ८३९ हेक्टर क्षेत्रात सिंचन झाले आहे. सिंचनाची टक्केवारी ४६.४० टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
अप्पर वर्धा धरणाला मूळ प्रशासकीय मान्यता १९६५ मध्ये मिळाली होती. तेव्हा या प्रकल्पाचा खर्च केवळ १३ कोटी रुपये होता. धरण पूर्ण व्हायला बराच कालावधी लागला. या प्रकल्पावर आतापर्यंत ११०६ कोटी रुपये खर्च झाला. प्रकल्पाला प्रथमत: १९७६ मध्ये अनुदान प्राप्त झाले होते. या प्रकल्पाचे एकूण लाभक्षेत्र ७५ हजार ८० हेक्टर आहे. या प्रकल्पातून प्रत्यक्ष सिंचन सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी नाही, असे सांगण्यात येत होते, पण वितरण व्यवस्थेतील दोषांमुळे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत व्यवस्थितपणे पाणी पोहोचू शकत नाही, अशा तक्रारी येत होत्या. दहा वर्षांपूर्वी २००३-०४ मध्ये तर या प्रकल्पातून केवळ १३ हजार हेक्टरचेच सिंचन होऊ शकले. दशकभरात परिस्थिती बदलली असून जलसंपदा विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दहा वर्षांत अप्पर वर्धा प्रकल्पाचे सरासरी सिंचन २४ हजार ७३५ हेक्टर इतके आहे. त्याची टक्केवारी ३२.९५ आहे. प्रकल्पाच्या एकूण सिंचन क्षमतेच्या तुलनेत २००७-०८ मध्ये तीनही हंगामामध्ये ३६ हजार ११९ हेक्टर सिंचन झाले. हा उच्चांक होता. २०१२-१३ या वर्षांत खरीप हंगामात ६ हजार २३८, रब्बी हंगामात २६ हजार ५१४ आणि उन्हाळी हंगामात २ हजार ८७ हेक्टर क्षेत्रात सिंचन होऊ शकले.
खरीप हंगामासाठी अप्पर वर्धा प्रकल्पातून ४५ हजार ६०९ हेक्टर, रब्बी हंगामात १५हजार ४३८ अणि दुहंगामीसाठी १४ हजार ३३ हेक्टर क्षेत्रात सिंचनाची सोय उपलब्ध होऊ शकते. खरीप हंगामात मागणीनुसार सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाते. प्रत्यक्षात अप्पर वर्धा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात पुरेशा प्रमाणात पाऊस होत असल्याने खरिपामध्ये मागणी क्वचितच आणि अल्प असते. प्रकल्प अहवालानुसार उन्हाळी हंगामातील सिंचन नियोजित नाही, पण पाण्याच्या उपलब्धतेनुसार जलाशय उपसा आणि कालवा उपसातून रब्बी हंगामात मंजूर प्रकल्प क्षमतेपेक्षा जास्त सिंचन होत असल्याचा जलसंपदा विभागाचा दावा आहे. २००६-०७ पासून अप्पर वर्धा प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रात वाढ होत गेली. प्रकल्पाच्या कालव्यांची अस्तरीकरणाची कामे ९९.५ टक्के पूर्ण झाली असून पाटचऱ्यांची ९० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. अप्पर वर्धा प्रकल्पाचा उजवा कालवा ९५.५० किलोमीटर लांबीचा असून डाव्या कालव्याची लांबी ४२.४० किलोमीटर आहे. ७० हजार हेक्टर क्षेत्रात वितरण व्यवस्था, तर ६६ हजार हेक्टर क्षेत्रात पाटचऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. धरणाचा संकल्पित पाणीसाठा ६७८ दशलक्ष घनमीटर आहे. धरणाच्या मुख्य कालव्यांना आणि वितरण प्रणालीसाठी अस्तरीकरण प्रस्तावित करण्यात आले, पण नंतर अस्तरीकरणाच्या कामाला स्थगिती दिल्याने अस्तरीकरणाच्या कामाला तब्बल १७ वष्रे विलंब झाला. त्यामुळे धरणाच्या किमतीतही ४२ कोटींची वाढ झाली. लाभक्षेत्रातील उंचक्षेत्र, नदीच्या किनारी लागवडीयोग्य नसलेले क्षेत्र, बिगरशेती क्षेत्र या कारणांमुळे सिंचन क्षमतेवरही परिणाम झाला.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Apr 2014 रोजी प्रकाशित
अप्पर वर्धा प्रकल्पाच्या सिंचनात लक्षणीय वाढ
अप्पर वर्धा प्रकल्पातून सिंचनासाठी पाण्याची मागणी नाही, हा सरकारी यंत्रणांचा तक्रारीचा सूर शेतकऱ्यांनी खोटा ठरवला असून २०१२-१३ या वर्षांत खरीप
First published on: 22-04-2014 at 07:26 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The upper wardha irrigation project increased significantly