महागाई, पाऊस, मंदीमुळे बजेट कोलमडले
९ सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवावर महागाई, पाऊस आणि व्यावसायिक मंदीचे संकट घोंघावत असल्याने गणेश मंडळांची चिंता वाढली आहे. सर्व पैलूंचा विचार करता मंडळांचे बजेट गेल्यावर्षीच्या तुलनेत एकूण ३० टक्के वाढणार असल्याचा अंदाज आहे. मान्सून सुरू झाल्यापासून विदर्भात पावसाची झड लागली आहे. दर दिवसाआड पावसाचा रट्टा बसत आहे. या परिस्थितीत गणेश मंडळांनी ताडपत्र्यांचा आडोसा लावणे भाग असल्याने त्यांचे बजेट वाढणार आहे. गणेश मूर्तीच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढल्या आहेत. पीओपी मूर्तीवर बंदी आली आहे, विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर करणे आता अनिवार्य झाले आहे. पेट्रोल, डिझेल चढतीवर असल्याने जास्तीचा वाहतूक खर्चदेखील सहन करावा लागणार आहे.
मूर्तीपुढे सजावट करणाऱ्या मंडळांना सजावटीच्या सर्वच वस्तू महागल्याने बजेटमध्ये कपात करावी लागण्याची चिन्हे आहेत. बडी गणेश मंडळेदेखील यंदा खर्चात कपात करण्याच्या निर्णयाप्रत आली असल्याने यंदाचा गणेशोत्सव पूर्वीइतका झगमगाटी राहणार नसल्याचे संकेत मिळाले आहेत. महागाईमुळे सामान्य कुटुंबाची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. त्यामुळे दारोदारी फिरून गोळा होणारी वर्गणीदेखील यावर्षी अपेक्षेप्रमाणे राहणार नसल्याचेच चित्र आहे. बडे वर्गणीदारही गतवर्षीच्या तुलनेत यंदा फारसा खर्च करण्याच्या स्थितीत नाहीत. मंदीचा आणि पावसाचा तडाखा बसल्याने व्यवसायात मंदी आल्याची उत्तरे देऊन गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बोळवण केली जात आहे.
मोठा फटका डेकोरेशनचे काम करणाऱ्यांना बसेल, अशी चिन्हे आहेत. बडय़ा गणेश मंडळांचे सजावट आणि रोषणाईचे बजेटही मोठे असते. काही मंडळे चलदृश्ये बसवून मोठय़ा प्रमाणात गणेशभक्तांना आकर्षित करतात. परंतु, सजावट साहित्याच्या किंमती आवाक्याबाहेर पोहोचल्या असून आर्टिस्ट्ची फीदेखील दुप्पट वाढली आहे. महाप्रसादाचे आयोजन करणारी मंडळे यावर्षी यात कपात करण्याची अधिक शक्यता आहे. प्रायोजक मिळविताना मंडळांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दरवर्षी देणग्या देणाऱ्यांनीही हात आखडता घेतल्याने मंडळांना कमी बजेटवर यंदा काम निभावून न्यावे लागले, असेच चित्र आहे.
एका विशिष्ट संपल्पनेवर चलचित्र तयार करणारी मंडळे यंदा खर्चात पडणार असल्याने नागपूरबाहेरील आर्टिस्ट्ला यावेळी निमंत्रण देण्यापेक्षा स्थानिक आर्टिस्ट्च्या भरवश्यावर मंडपाची सजावट करण्यावर मंडळांनी भर दिला आहे.
पावसामुळे सर्वाधिक अडचण गणेश मूर्ती बनविणाऱ्या कलाकारांची झाली आहे. पावसाने उघाड दिली नसल्याने सूर्यदर्शन गेल्या कित्येक दिवसात झालेले नाही. सतत ढगाळलेले वातावरण आहे. मूर्ती अजूनही सुकलेल्या नाहीत. त्या कृत्रिम पद्धतीने सुकवाव्या लागत असल्याने मूर्तीच्या किमती वाढविण्याशिवाय पर्याय नाही, असे चितार ओळीतील सूर्यवंशी पेंटरने सांगितले. काही मंडळांशी संपर्क साधला असता यावेळी अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव कसा साजरा करता येईल, याच दृष्टीने विचार केला जात असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.