राज्य सरकारने जादूटोणाविरोधी अध्यादेश काढल्यानंतर या कायद्यांतर्गत प्रकरण दाखल करण्यासाठी शहर पोलिसांना तीन आठवडय़ांचा कालावधी लागल्याचे उघडकीस आले आहे.
एका पीडित युवतीने या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यासाठी शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चकरा मारल्या. अखेर नंदनवन पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण दाखल करण्यासाठी जिल्ह्य़ाचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे, पोलीस आयुक्त के.के. पाठक यांच्याकडेही युवतीला चकरा माराव्या लागल्या. जादूटोणाविरोधी अध्यादेश २६ ऑगस्ट २०१३ ला कायद्याच्या रूपात जारी करण्यात आला, परंतु पीडित युवतीच्या भावना समजून घेण्यास पोलीस तयार नव्हते. दिघोरी परिसरात राहणारी एक युवती समस्याग्रस्त होती. तिचा विवाह जुळल्यानंतर तुटत होता. कुटुंबातील सदस्यही तिला अशुभ समजू लागले. अनेकांचे बोलणे ऐकून ती चूप बसत असे. अशा समस्या सात तासात सोडविण्याचा दावा करणाऱ्या एका फेकू बाबाची माहिती तिला एका पत्रकातून मिळाली. त्या पत्रकावरील मोबाईल क्रमांकावर पीडित युवतीने संपर्क साधला. बाबाने अजमेरला असल्याचे सांगून एसएमएसद्वारे बँकेच्या खात्याचा क्रमांक देऊन साडेतीन हजार रुपये जमा करण्यास सांगितले. तीन दिवसात या बाबाने ८१ हजार रुपये लुटले. पीडित युवतीने प्रकरणाची तक्रार दाखल करण्यासाठी शहरातील विविध पोलीस ठाणे गाठले, परंतु तिची तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही, अखेर युवतीने अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यालयात तक्रार दिली. समितीचे कार्याध्यक्ष उमेश चौबे, हरीश देशमुख, उत्तम सुळके यांच्या प्रयत्नाने पोलीस आयुक्तांच्या निर्देशानंतर अखेर नंदनवन पोलीस ठाण्यात हे प्रकरण दाखल करण्यात आले. जादूटोणा अध्यादेश जारी झाल्यानंतर या अंतर्गत प्रकरण दाखल करण्यासाठी पोलिसांना तीन आठवडे लागले, असा आरोप समितीने केला आहे.