काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरुद्ध अपशब्द बोलणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांना जशास तसे उत्तर देऊ. काँग्रेसवाल्यांनी हातात बांगडय़ा भरल्या नाहीत. त्यामुळे इतरांना धमक्या देण्याचे गडकरींना टाळावे, असा इशारा माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिला.
गडकऱ्यांचे वागणे चुकीचे असून सत्ते आल्यावर प्राप्तीकर अधिकाऱ्यांना पाहून घेऊन अशी धमकी त्यांनी दिल्याचे वृत्त वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाले. त्याचा हवाला देत रणजित देशमुख म्हणाले, काँग्रेस नेत्यांच्या उद्योगांवर छापा घातला तर चांगले, मात्र गडकरींच्या उद्योगांवर छापा घातला तर प्राप्तीकर अधिकारी वाईट हा अजब न्याय असून गडकरी यांनी असे वागणे सोडावे.
इतरांना पाहून घेऊ अशी धमकी गडकरींनी देऊ नये. कारण राजकारणात सर्वच सर्वाना पाहतात. काँग्रेसवाल्यांनी हातात बांगडय़ा भरल्या नाहीत. त्यांनाही जशास तसे उत्तर देता येते, असे देशमुख म्हणाले.
एकीकडे सोनिया गांधी विरुद्ध अपशब्द वापरत असताना दुसरीकडे काँग्रेसचे राज्यसभा सदस्य विजय दर्डा दर्डा गडकरींना ‘नागपूरचा वाघ’ अशी उपमा देत होते. याविषयी पत्रकारांनी रणजित देशमुख यांना विचारले असता काँग्रेसच्या वरिष्ठांपर्यंत ही माहिती पोहचू अशी सारवासारव त्यांनी केली.