हल्लेखोरांपैकी एकाचा गोळी लागून मृत्यू; एक गंभीर जखमी

िपपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाचे दिवंगत शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन ऊर्फ गोटय़ा कुंडलिक धावडे (वय ३१) याचा गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास भोसरीच्या धावडेवस्ती भागात १२ ते १५ हल्लेखोरांनी तलवार व कोयत्याचे वार करून खून केला. हल्लेखोरांपैकी एकाचा या घटनेत गोळी लागून मृत्यू झाला, मात्र ही गोळी कुणी झाडली हे स्पष्ट होऊ शकले नाही. धावडे याचा एक साथीदार गंभीर जखमी झाला आहे. ७ नोव्हेंबर २००६ रोजी लांडगे यांची हत्या झाली होती. याचा बदला घेण्यासाठीच धावडेचा खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
खुनाच्या या घटनेनंतर भोसरी व धावडेवस्ती भागामध्ये तणावाचे वातावरण आहे. आरोपींबाबत माहिती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मात्र, या प्रकरणात कोणालाही ताब्यात घेण्यात आले नव्हते. हल्लेखोरांपैकी एक अंकुश रामदास लकडे (वय २७, रा. धावडे वस्ती, भोसरी) याचा या घटनेत गोळी लागून मृत्यू झाला. धावडेचा साथीदार संदीप रामचंद्र मधुरे (वय ३०, रा. आकुर्डी) हा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे.
सहा वर्षांपूवी लांडगे यांची त्यांच्याच घरासमोर डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकारानंतर संतप्त जमावाने धावडेवस्ती भागातील दोघांचा खून केला होता. लांडगे यांच्याबरोबरच आणखी एकाच्या खुनाचा आरोप धावडेवर होता. त्यानंतर त्याला हद्दपार करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच तो पुन्हा धावडेवस्तीत परतला होता.
घटनेबाबत पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी बाराच्या सुमारास धावडे व त्याचे चार साथीदार धावडेच्या कार्यालयासमोर बसले होते. एका छोटय़ा टेम्पोतून हल्लेखोर आले. कोयता, तलवार व हॉकी स्टीक घेऊन आलेल्या हल्लेखोरांनी धावडे व त्याच्या साथीदारांवर हल्ला केला. चेहरा झाकण्यासाठी सर्वानी माकडटोप्या घातल्या होत्या. हल्लेखोरांपैकी एकाने टेम्पोतून उतरताच रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. केवळ पाच ते सहा मिनिटांतच हा प्रकार करून हल्लेखोर त्याच टेम्पोतून पसार झाले. धावडेच्या डोक्यावर कोयता व तलवारीने अनेक वार करण्यात आले. त्याला व जखमी साथीदाराला रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, धावडेचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. घटनास्थळापासून काही अंतरावरच हल्लेखोरांपैकी एक असलेल्या लकडे याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या बरगडीत गोळी लागली होती. घटनास्थळी पोलिसांना दोन तलवारी सापडल्या. या तलवारीच्या माध्यमातून श्वानपथकाने हल्लेखोरांच्या टेम्पोचा शोध लावला. हा टेम्पो लांडगे यांच्या घरापासून काही अंतरावरच सापडला. टेम्पोत हॉकी स्टीक व दगड पोलिसांना मिळाले. हा टेम्पो लातूरमधील असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.       

कोण हा गोटय़ा धावडे?
लांडगे व धावडे या दोन्ही परिवारांची भावकी आहे. मात्र, गल्लीतील किरकोळ वादातून लांडगे व धावडे कुटुंबातील मुलांचे दोन गट पडले. गल्लीतील छोटय़ा- छोटय़ा कुरबुरी हळूहळू वाढत गेल्या अन् लांडगे गटाचा आधार असणारे अंकुश लांडगे यांची हत्या झाली. त्यापूर्वी गल्लीतील किरकोळ वादावादी वगळता धावडेची कोणतीही गुन्हेगारी पाश्र्वभूमी नव्हती. लांडगे यांच्या हत्येच्या प्रकरणात जामिनीवर सुटल्यानंतर धावडेची त्याच्या साथीदारांनी वादग्रस्त मिरवणूक काढली होती. मात्र, पोलिसांची तातडीने हस्तक्षेप करीत ही मिरवणूक उधळून लावली. जुलै २००९ मध्ये सुनील कारभारी गायकवाड (वय २१, रा. दीघी) याच्या खुनामध्येही धावडे आरोपी होता. दोन खुनांबरोबरच दंगल घडविणे, मारामारी आदी गुन्ह्य़ांत त्याचा समावेश होता. त्यामुळे धावडेला ऑक्टोबर २००९ पासून हद्दपार करण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लकडेला गोळी लागली कशी?
धावडेवस्तीतीत प्रकारात गोळी लागून ठार झालेला अंकुश रामदास लकडे याच्या मृत्यूबाबत विविध शंका व्यक्त केल्या जात आहेत. खिशातील ओळखपत्रामुळे त्याचे नाव समजू शकले. सर्व हल्लेखोर चेहरा झाकण्यासाठी माकडटोपी घालून आले होते. लकडे याच्या चेहऱ्यावरही ही टोपी होती. त्याचप्रमाणे त्याच्या हातात कोयता होता. त्यामुळे तो हल्लेखोरांपैकी असावा, असा निष्कर्ष काढण्यात आला. मात्र, हल्लेखोरांकडूनच त्याला चुकून गोळी लागली की धावडेच्या साथीदारांनी त्याला गोळी मारली, हे स्पष्ट झाले नाही.
अंकुश लांडगे यांच्या खुनानंतर..
भाजपचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष व नगरसेवक अंकुश लांडगे यांचा ७ नोव्हेंबर २००६ च्या रात्री भोसरीत राहत्या घरासमोर खून झाला. िपपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर आलेल्या असताना त्यांचा खून झाल्याने खळबळ उडाली होती. या घटनेची दखल तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीही घेतली होती. लांडगे यांच्या अंत्ययात्रेत नितीन गडकरी गोपीनाथ मुंडे यांनी हजेरी लावली होती. या घटनेनंतर विरोधी पक्षांनी विधिमंडळाचे कामकाज एक दिवस रोखून धरले. श्रध्दांजली सभेत बोलताना भाजपनेते विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर खुनाचा संशय व्यक्त केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. लांडगे यांनी िपपरी पालिकेत भाजपच्या २५ जागा निवडून आणण्याचे व युतीसह सत्तेच्या जवळपास पोहोचण्याची व्यूहरचना केली होती. मात्र, त्याआधीच त्यांचा खून झाला. ही निवडणूक व पुढे विधानसभा, लोकसभा निवडणुकीतही लांडगे यांच्या खुनाचा मुद्दा प्रभावी ठरला होता. लांडगे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीची आता सहा वर्षांनंतर त्याच भोसरीत हत्या झाली.