* वातानुकुलित बसेस सकाळी नाहीत
*  ठाणे, भाईंदर, नवी मुंबई येथील बस टोलनाक्यांआधीच थांबणार
बुधवारच्या टोलविरोधी आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर ‘बेस्ट’ खास खबरदारी घेणार आहे. हे आंदोलन मुख्यत्वे मुंबईच्या सीमांवरील टोलनाक्यांच्या परिसरात होण्याची शक्यता असल्याने मुंबईबाहेर जाणाऱ्या बेस्टच्या बसेस टोलनाक्यांच्या अलीकडील शेवटच्या थांब्यांवरून मागे वळतील. तर वातानुकुलित गाडय़ा सकाळी बाहेरच निघणार नाहीत. दुपारनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन मग या गाडय़ांबाबत निर्णय घेण्यात येईल.
राजकीय पक्षांच्या आंदोलनात नेहमीच बेस्टचे अतोनात नुकसान होत आले आहे. बुधवारी मनसे ‘शांततापूर्वक’ आंदोलन करणार असली, तरीही आम्ही आमच्याकडून आमच्या बसगाडय़ांच्या कोणतेही नुकसान होणार नाही, याची काळजी घेणार आहोत, असे बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी बेस्ट समितीच्या सभेत स्पष्ट केले.
वातानुकुलित बसेसबाबत बेस्ट अधिक काळजी घेणार आहे. सकाळी या गाडय़ा रस्त्यावर उतरणार नाहीत. त्यांच्या ऐवजी त्या मार्गावर साध्या गाडय़ा धावतील. या वेळी प्रवाशांना वातानुकुलित मार्गाचे तिकीट काढावे लागले, तर त्यांना पैसे परत केले जातील. तिकीट व्हेंडिंग मशिन्सच्या तुटवडय़ामुळे असे होण्याची शक्यता गुप्ता यांनी वर्तवली.
ठाणे, नवी मुंबई, मीरारोड-भाईंदर येथून मुंबईकडे येणाऱ्या किंवा या दिशेला जाणाऱ्या गाडय़ांच्या फेऱ्या टोलनाक्याच्या आधीच्या थांब्यांपर्यंतच चालवल्या जातील. त्यानंतर या फेऱ्या पुन्हा मुंबईकडे वळवल्या जातील, असे गुप्ता म्हणाले.