नगर शहर व परिसरात शुक्रवारी दमदार आषाढसरी कोसळल्या. शहरात दिवसभर संततधार सुरू होती. अधूनमधून मोठय़ा सरी कोसळल्या.
मध्यंतरी एक दिवसाचा अपवाद वगळता शहरात पावसाने चांगलीच विश्रांती घेतली होती. मात्र गुरूवारपासून पुन्हा वातावरण जमून आले. प्रत्यक्षात पाऊस झाला नव्हता. शुक्रवारी सकाळपासूनच शहरात हलकी भुरभूर सुरू झाली, ती सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. दुपारी व सायंकाळी वेळ पावसाचा चांगला जोर होता. आषाढ सुरू झाल्यानंतर शहरात प्रथमच दमदार पाऊस झाला. संततधार पावसाने शहरातील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले. या पावसानेही सखल भागात चांगलेच पाणी साचले. शहरातील रस्त्यांची पावसाने अधिकच दुरावस्था झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.
जिल्ह्य़ाच्या अन्य भागात विशेषत: ग्रामीण भागात मात्र दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षाच आहे. मान्सूनपुर्व पाऊस चांगला झाल्याने बऱ्याच ठिकाणी बऱ्यापैकी खरीपाच्या पेरण्या झाल्या. मात्र पुढे पावसाने ताण दिल्याने पेरण्या झालेल्या ठिकाणी शेतकरी चिंतेत आहेत.