वाहतूक कोंडीचा गुंतवणुकीवरही परिणाम

रायगड जिल्हा व नवी मुंबईतील एक औद्योगिक तालुका म्हणून उरण तालुका ओळखला जात असून तालुक्यात जागतिक पातळीवरील ओ.एन.जी.सी, जेएनपीटी बंदर, वायू विद्युत केंद्र तसेच भारत

रायगड जिल्हा व नवी मुंबईतील एक औद्योगिक तालुका म्हणून उरण तालुका ओळखला जात असून तालुक्यात जागतिक पातळीवरील ओ.एन.जी.सी, जेएनपीटी बंदर, वायू विद्युत केंद्र तसेच भारत पेट्रोलियमचा घरगुती गॅस भरणा प्रकल्प तसेच जेएनपीटी बंदरावर आधारित तसेच इतरही उद्योगातील मालाची ने-आण करणाऱ्या तसेच लहान-मोठय़ा प्रवासी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रस्त्यांचे रुंदीकरण होऊनही वाहतूक कोंडीतही अनेक पटीने वाढत आहे. त्याचा परिणाम आता गुंतवणुकीवरही होऊ लागला आहे.
ही वाहतूक कोंडी करळ ते दास्तानपासून सरकत पनवेलकडील गव्हाण फाटय़ापर्यंत पोहोचल्याने परिणामाची अधिक झळ पोहचू नये यासाठी जेएनपीटी बंदरावर आधारित उद्योगातील व्यावसायिक आता गुजरातकडे वळू लागले आहेत.
उरणमध्ये जायचे म्हटले तर नको रे बाबा! असे म्हणण्याची वेळ प्रवासी व व्यावसायिकांवर आली आहे. जेएनपीटी बंदरातील कंटेनर हाताळणीची एक लाख क्षमता असताना तयार केलेली दळणवळणाची व्यवस्था व रस्ते सध्याच्या जेएनपीटीसह, पी.अँड ओ.व जीटीआय या दोन खाजगी बंदरांच्या निर्मितीनंतर त्यात वाढ होऊन पन्नास लाखांवर गेली असतांनाही रस्ते अपुरे पडत असल्याने, मागील तीन ते चार वर्षांपासून जेएनपीटी परिसरातील करळ जंक्शन तसेच धुतूमजवळ दररोज वाहतूककोंडीला सामारे जावे लागत आहे. करळ जंक्शनवर १९८९ साली करळ पुलाची निर्मिती करण्यात आली होती. या पुलावरून दररोज सहा ते सात हजार अवजड वाहने दररोज प्रवास करीत आहेत. प्रवासी व हलकी वाहनेही मोठय़ा संख्येने धावत आहेत. त्यामुळे तासन्तास वाहतूककोंडीला सामारे जावे लागत आहे.
याच परिसरात दररोज चाळीस ते पन्नास हजार कामगार मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्य़ातून नोकरी, व्यवसायानिमित्ताने ये-जा करीत आहेत. नेहमीप्रमाणे उरणमधून प्रवास करणाऱ्या वाहनांचीही संख्या मोठी आहे. शेतीतील व उद्योगांतील व्यवसायांतून आलेल्या पशांमुळे चारचाकी वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. रस्त्यांचे चौपदरीकरण केले असले तरी अवजड वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभी राहत असल्याने वाहनांच्या वापराकरिता केवळ एकच माíगका शिल्लक राहते. त्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. वाहतूककोंडीवर उपाय करून ती दूर करण्यासाठी आंदोलनेही झाली. आंदोलनांमुळेही बंद असल्यानेही येथील उद्योगांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीमुळे बंदरातील व्यवसायांवरही परिणाम जाणवू लागला आहे.

बंदरातील व्यवसाय गुजरातकडे?
जेएनपीटी बंदरातील पी.अ‍ॅण्ड ओ.व जीटीआय या दोन्ही खाजगी बंदरांतील व्यवसायाने उरणमधील वाहतूककोंडीमुळे गुजरातकडे धाव घेतली आहे. त्याचा परिणाम या दोन्ही बंदरांच्या व्यवसायावरही झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भविष्यात न्हावा-शेवा सागरी सेतू, रेवस-करंजा,नेरूळ-उरण रेल्वे प्रकल्प यामुळे विकसित होणारा विभाग म्हणून उरणमध्ये होणारी गुंतवणूकही मंदावली असून त्याचा सर्वाधिक फटका येथील जमिनींच्या दरात घट होण्यात व व्यवहार थांबण्यात झाल्याचे मत एका व्यवसायिकाने व्यक्त केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Traffic jam at uran jnpt

ताज्या बातम्या