मुंबईकरांचे सुखकर प्रवासाचे स्वप्न पूर्ण करण्याचा दावा करणाऱ्या पांजरपोळ-घाटकोपर जोडरस्त्याने प्रवास काही प्रमाणात सुखकर झाला असला, तरी प्रत्यक्षात झोपडय़ा आणि तिवरांच्या जंगलामुळे हा रस्ता शिवाजी नगपर्यंतच येत असल्याने पूर्व मुक्तमार्ग हा पूर्व द्रुतगती महामार्गाआधीच खुंटल्याने छेडानगर येथे मोठी वाहतूक कोंडी होत आहे. घाटकोपर-मानखुर्द रस्त्यामार्गे पूर्व मुक्तमार्गावरील वाहने द्रुतगती महामार्गाकडे येताना वाहतूक मोठय़ा प्रमाणात विस्कळीत होत असून वाहन चालक आणि प्रवाशांच्या संयमाची परीक्षा सुरू आहे.
पूर्व मुक्तमार्गावरील पांजरपोळ-घाटकोपर जोडरस्ता पूर्ण झाल्यानंतर फोर्ट ते घाटकोपर हे अंतर अध्र्या तासात गाठणे शक्य होईल, असा दावा एमएमआरडीएने केला होता. हा दावा बहुतांशी खरा ठरला असला, तरी प्रत्यक्षात घाटकोपरऐवजी हा मार्ग शिवाजी नगर येथेच उतरतो. तेथून पुढे घाटकोपर-मानखुर्द या मार्गाचा आधार घेऊन पूर्व द्रुतगती महामार्गावर यावे लागते. हा मार्ग पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडण्यासाठी एमएमआरडीएची तयारी आहे. मात्र खारफुटी आणि झोपडपट्टय़ा यांच्या अडथळ्यामुळे तो वाढवता येत नसल्याचे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यूपीएस मदान यांनी उद्घाटनप्रसंगीच स्पष्ट केले होते.
त्यामुळे उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी, मंगळवारी संध्याकाळी फोर्टकडून निघालेली वाहने पूर्व मुक्तमार्गावरून घाटकोपर-मानखुर्द रस्त्यावर शिवाजी नगर येथे उतरली. या रस्त्याने पूर्व द्रुतगती महामार्गावर छेडा नगर येथे आल्यानंतर वाहतूक कोंडी झाली. या ठिकाणी मुंबईकडून पूर्व द्रुतगती महामार्गाद्वारे येणारी वाहने, सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्यावरून येणारी वाहने आणि मानखुर्द-घाटकोपर रस्त्यावरून येणारी वाहने एकत्र आल्याने वाहनांचा लोंढा जमला होता. परिणामी वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू होती.
याबाबत मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त केशव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वाहतूक कोंडी होत असल्याचा दावा फेटाळून लावला. वाहनांचा ओघ जास्त असल्याने येथील वाहतूक अधिक दाट आहे. मात्र कोंडी झाली नसून वाहने एकामागोमाग एक पुढे सरकत आहेत, असे त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jun 2014 रोजी प्रकाशित
पांजरपोळ-घाटकोपर जोडरस्ता महामार्गाआधीच खुंटल्यामुळे वाहतूक कोंडी
मुंबईकरांचे सुखकर प्रवासाचे स्वप्न पूर्ण करण्याचा दावा करणाऱ्या पांजरपोळ-घाटकोपर जोडरस्त्याने प्रवास काही प्रमाणात सुखकर झाला असला, तरी प्रत्यक्षात झोपडय़ा आणि तिवरांच्या जंगलामुळे हा रस्ता शिवाजी
First published on: 19-06-2014 at 08:54 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic problems near panjarpol ghatkopar link road