शहरात वाहतूक शाखेतील बहुतांश पोलीस कर्मचाऱ्यांना वाहतूक नियंत्रणाचे प्रशिक्षणच मिळाले नसल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. वाहतूक शाखेतील २४० पैकी फार तर ९० कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण झाले. एवढेच नाही तर सहायक पोलीस आयुक्त अजित बोऱ्हाडे यांच्यासह ३ निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी केवळ दोन दिवसांच्या कार्यशाळेला हजेरी लावली. वाहतुकीला नियंत्रित करण्यासाठी प्रशिक्षण देणारी संस्था मुंबईतील भायखळा येथे आहे. तेथून बोलावणे येते, तेव्हाच वाहतूक पोलिसांना प्रशिक्षणाला पाठविले जाते, असे पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.
नवीन वर्षांत वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून जनजागरण व्हावे, या उद्देशाने उद्यापासून (मंगळवार) विशेष पंधरवाडा साजरा केला जाणार आहे. दि. १५ जानेवारीपर्यंत रक्तदान शिबिरापासून ते रिक्षा सजावट स्पर्धा असे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या निमित्ताने पोलीस दलातील किती कर्मचारी प्रशिक्षित आहेत, असा प्रश्न पत्रकार बैठकीत उपस्थित झाला आणि बहुतांश कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणच मिळाले नसल्याचे उपायुक्त घार्गे यांनी मान्य केले.
सध्या शहरात २४० वाहतूक पोलीस कर्मचारी आहेत. गेल्याच महिन्यात ३० कर्मचारी वाढवून देण्यात आले. २४० पैकी ९० जणांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. वाहतूक शाखेतील ३ निरीक्षकांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले नाही. पाच सहायक निरीक्षकांपैकी तिघांचे प्रशिक्षण झाले.  ३० दिवसांच्या प्रशिक्षणासाठी काही मोजकेच कर्मचारी भायखळा येथे बोलविले जातात. प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचीच मर्यादा असल्याचे उपायुक्त जय जाधव यांनी सांगितले. वाहतुकीला शिस्त लागावी, म्हणून या पंधरवडय़ात कर्मचाऱ्यांसाठीही कार्यशाळा घेतली जाणार असून, सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. अ‍ॅपेरिक्षा चालकांच्या संघटनांशी चर्चा केली जाईल, पण चालकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचे घार्गे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.