पनवेल एसटी स्थानकासमोरील उड्डाणपुलाखाली बेशिस्त सहा आसनी रिक्षाचालकांच्या अवैध पार्किंगमुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या संदर्भात वारंवार तक्रारी करूनसुद्धा वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने रिक्षाचालकांची दादागिरी वाढली आहे. एखाद्या नागरिकांनी रिक्षाचालकाला हटकल्यास चालकाचा घोळका त्याच्यावर तुटून पडत असल्याचे अनेकदा पाहावयास मिळते. एकीकडे पोलीस कारवाई करीत आणि लोकप्रतिनिधींकडे तक्रार केल्यास त्याची दखल घेतली जात नसल्याने दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न सर्वसामान्य पनवेलकरांना पडला आहे.
उड्डाणपुलाखाली सहा आसनी रिक्षाचालकांनी त्यांचे बस्तान मांडले आहे. एका पक्षाच्या आमदाराच्या नावाखाली येथे रिक्षासंघटना कार्यरत आहे. आमदारांच्या नावाचा गैरफायदा उचलत रिक्षाचालक दहशत पसरवीत आहेत. एखाद्या व्यक्तीने रिक्षाचालकांना बेशिस्तीबद्दल विचारणा केल्यास रिक्षाचालक त्या व्यक्तीला थेट आमदाराचे नाव सांगण्यात येते. मुळात याबाबत त्या आमदारांना काहीच माहीत नसल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे क्षमतेपेक्षा अधिकची प्रवासी वाहतूक पोलिसांना दिसत नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मुळात या परिसरात वाहतूक आणि परिवहन विभागातील अधिकारी कमी वेळा दिसतात. सामान्य वाहनचालकांना वाहनपरवाना जवळ न बाळगल्यास त्या व्यक्तीला कायद्याचे ज्ञान देणारे पोलीस कर्मचारी मात्र, या रिक्षाचालकांच्या धाकाखाली वावरतात का, हा प्रश्न सर्वसामान्य पनवेलकरांना सतावत आहे. याबाबत पनवेलचे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, वाहतूक विभागाकडून रिक्षाचालकांवर कारवाई सुरूच असते. दिवसाला २० रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाईचे सत्र सुरूच आहे. लवकरच पनवेल एसटी स्टॅण्डसमोरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.