संकटे प्रामुख्याने नैसर्गिक  व मानवनिर्मित अशी दोन प्रकारची आहेत. या दोन्ही संकटांमध्ये जीवित, वित्त व निसर्गाची मोठय़ा प्रमाणात हानी होते. अणुऊर्जेचा उपयोग मानवाच्या विकास आणि वृद्धीसाठी होतो, त्याचप्रमाणे विध्वंस घडवून आणण्यासाठीही ती वापरली जाते. मानवनिर्मित किरणोत्सर्गी महासंकट (रेडिओलॉजिकल डिझास्टर) हे अत्यंत भीषण आहे. अणुऊर्जेतून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी अत्यंत काळजी घ्यावी लागत आहे. या कामात नागपूरचे आकस्मिक मदत पथक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असल्याचे अ‍ॅटोनॉमिक मिनरल्स डायरेक्टोरेट फॉर एक्स्लोरेशन अ‍ॅण्ड रिसर्चचे प्रादेशिक संचालक डॉ. अमित मजुमदार यांनी सांगितले.
रमण विज्ञान केंद्रातर्फे ‘नैसर्गिक व मानवनिर्मिती संकटे’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात ‘रेडिओलॉजिकल डिझास्टर प्रीपरिंग फॉर वर्स्ट’ या विषयावरील व्याख्यानात डॉ. मजुमदार बोलत होते.
उत्तराखंडमध्ये अलीकडेच झालेल्या नैसर्गिक आपत्तीचा उल्लेख करून डॉ. मजुमदार म्हणाले, पूर, वादळ, त्सुनामी, चक्रीवादळ, भूकंप, दुष्काळ, भूस्खलन, ढगफुटी अशी नैसर्गिक संकटे येत आहेत. यामध्ये जीवित व मालमत्तेची मोठी हानी होते, त्याहीपेक्षा निसर्गाचेही मोठे नुकसान होते. निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी पाणी वाया घालवू नका, असा सल्लाही डॉ. मजुमदार यांनी दिला. अणुभट्टीमध्ये झालेले स्फोट, रेल्वे दुर्घटना, स्फोटकांचा दहशतवाद्यांकडून होत असलेला वापर अशा स्वरूपाची मानवनिर्मित संकटे आहेत. रशियातील चर्नोबेल येथील आण्वि ऊर्जा प्रकल्पात झालेली दुर्घटना, देशातील भोपाळमधील कार्बाईड गॅस दुर्घटना, जपानच्या दोन शहरांवर दुसऱ्या महायुद्धात टाकण्यात आलेले अणुबॉम्ब ही मानवनिर्मिती दुर्घटनांची ठळक उदाहरणे आहेत. ३२ हजार टन कोळशातून जेवढी ऊर्जा तयार होते, तेवढी ऊर्जा केवळ १ किलो युरेनियममधून तयार होते, अशी संकटे टाळण्यासाठी रेडिओलॉजिकल मेटरिअलची हाताळणी अत्यंत काळजीपूर्वक होणे गरजेचे आहे. नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांचा सामाना करण्यासाठी देशात १८ केंद्रे तयार करण्यात आली आहेत. यामध्ये नागपूरच्या केंद्राचा समावेश आहे. हे केंद्र संकटाचा सामना करण्यात उत्तमप्रकारे जबाबदारी पोर पाडत आहे. संकटांचा सामना करण्यासाठी आकस्मिक पूर्वतयारी योजना, आग विझविण्यासाठी यंत्रणा, वैद्यकीय पथक, पाणी आणि अन्नाचा तातडीने पुरवठा आदी स्वरूपाची काळजी घेणे आवश्यक असते. संकट कोणत्या स्वरूपाचे आहे, हे पाहून देश, राज्य, जिल्हा व स्थानिक पातळीवर उपाययोजना करण्यात येतात. संकटग्रस्त भागाची प्रारंभी हवाई पाहणी करून आढावा घेतला जातो. नागपूर हे नैसर्गिक संकटांपासून अत्यंत सुरक्षित असे शहर आहे. या पट्टय़ात भूकंप, त्सुनामी, वादळ, ज्वालामुखी अशी नैसर्गिक आपत्ती उद्भवण्याची भीती नाही, असेही डॉ. मजुमदार म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन केंद्राचे शिक्षण अधिकारी विलास चौधरी यांनी केले. आभार केंद्राचे समन्वयक डॉ. विनायक जोशी यांनी मानले. हे प्रदर्शन सर्वासाठी २० ऑक्टोबपर्यंत सकाळी ११.३० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुले आहे.