कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत क्षयरोग रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली असून पालिका तसेच खासगी रुग्णालयांमध्ये सुमारे चारशे ते पाचशे क्षयरोग रुग्ण उपचार घेत असल्याची धक्कादायक माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. तसेच या रुग्णांची संख्या त्याहून अधिक असण्याची शक्यताही सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. असे असतानाही महापालिकेची या रोगासंबंधी उपाययोजना आणि जनजागृती मोहीम कागदावरच राहत असल्याचे चित्र समोर आले आहे.
क्षयाच्या रुग्णांना सुरुवातीला प्रतिबंधक गोळ्या (मल्टि ड्रग रेझिस्टन्स) सुरू केल्या जातात. पहिल्या चार ते पाच महिन्यात या गोळ्या घेतल्यानंतर रुग्ण बरा होणे अपेक्षित असते. या गोळ्या रुग्णाने नियमित घ्याव्यात म्हणून पालिकेच्या आरोग्य विभागातील काही कर्मचारी विभागवार नियुक्त केले आहेत. क्षयरोग रुग्णाने नियमित गोळ्या घ्याव्यात, त्यांनी व्यसनापासून दूर राहावे, पथ्यपाणी पाळावे असे सांगणे त्या कर्मचाऱ्यांचे काम असते. मात्र, हे कर्मचारी त्यांची जबाबदारी पार पाडताना दिसून येत नाहीत. त्यामुळे रुग्णांकडून पथ्य पाळले जात नसल्याने क्षयरोग रुग्ण बरा करण्यासाठी राबविण्यात येणारी मोहीम कागदावरच राहत असल्याचे चित्र आहे. एमडीआरचा डोस एक दिवस जरी चुकला तरी रोग बळावण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे रुग्णांना ही माहिती देण्यासाठी महापालिकेने रस्ते, झोपडपट्टी भागात पथनाटय़, जनजागृतीविषयक कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे. मात्र, अशा कार्यक्रमांची केवळ कागदोपत्री माहिती दिखाव्यासाठी तयार केली जाते. प्रत्यक्षात असा कोणताही कार्यक्रम पालिका कर्मचाऱ्यांकडून राबवला जात नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. अनेक वेळा क्षयरोगाची औषधे पालिकेत नसतात. शासनाकडून आल्याशिवाय पालिका ती खरेदी करीत नाही. या वेळकाढूपणाचा रुग्णाच्या आरोग्यावर परिणाम होतो. या गोळ्यांचा रुग्णांच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो. अनेक वेळा चुकीचे निदान झाल्याने रुग्णाला खोकला आहे, असे समजून वर्षभर खोकल्याची औषधे देऊन त्याचा क्षयरोगाचा आजार वाढवला जातो, असेही सूत्रांनी सांगितले.

कळवा रुग्णालयात उपचार
पालिका हद्दीत संशयित क्षयरोगाचा रुग्ण आढळल्यास त्याच्या प्राथमिक वैद्यकीय तपासण्या करून त्यासंबंधीचा अहवाल जे. जे. रुग्णालयात पाठविला जातो. तेथे अहवालाची पाहाणी करून क्षयरोग आहे की नाही, यासंबंधी रुग्णास कळविण्यात येते. क्षयरोगाची लागण झाली असेल तर त्या रुग्णावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील क्षय रुग्ण कक्षात एमडीआरचे (डीआरटीसी) उपचार सुरू केले जातात. ठाणे, रायगड आणि रत्नागिरीसाठी शासनाचे हे एकमेव उपचार केंद्र आहे. या केंद्रात रुग्णांवर मोफत उपचार व औषधे दिली जातात. ती औषधे रुग्णाने नियमित घ्यावीत म्हणून पालिका कर्मचाऱ्यांकडून त्याचा पाठपुरावा केला जातो. पुणे येथून क्षयरोगाच्या प्रतिबंधक गोळ्या शासकीय रुग्णालयांना पुरवल्या जातात. अनेक वेळा साठा कमी आला की तो साठा पुरवून वापरायची कसरत करावी लागते, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिकेतील क्षयरोग रुग्ण विभागाचे प्रमुख डॉ. कदम यांनी दिली. शासनाने क्षयरोग रुग्णांचे एक पोर्टल ऑनलाईन सुरू केले आहे. तेथे राज्य, देश, पालिका हद्दीतील सर्व क्षय रुग्णांची माहिती एकत्रितरीत्या मिळते, असे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. लीलाधर म्हस्के यांनी सांगितले.

औषधविक्रेते समुपदेशक
क्षयरोगाचा रुग्ण औषध विक्रीच्या दुकानात गेला तर त्याला तेथील औषध विक्रेता आता कोणती औषधे कधी घ्यायची, त्याने पाळायची पथ्ये याविषयी माहिती देत असतो. डॉटस् सुविधा, एमडीआरचे डोस याविषयी जागृती करण्याचे काम मोठय़ा प्रमाणात शासकीय, संस्था पातळीवर सुरू असल्याने पूर्वीसारखी गंभीर परिस्थिती आता राहिली नाही, असे क्षयरोगाविषयी जनजागृती करणाऱ्या उल्हासनगर येथील प्रिं. के. एम. कुंदनानी औषधशास्त्र महाविद्यालयातील उपप्राचार्य मंजिरी घरत यांनी सांगितले.