अभिनेते सयाजी शिंदे लिखित ‘तुंबारा’ या मुक्त छंदातील काव्य-नाटय़ पुस्तकाचे तसेच याच पुस्तकाच्या शिंदे यांच्याच आवाजातील ध्वनिफितीचे प्रकाशन वांद्रे येथील ‘एमआयजी’ क्लबच्या सभागृहात अनुक्रमे ज्येष्ठ समीक्षक रंगनाथ पठारे आणि अभिनेता सुबोध भावे यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ लेखिका शांता गोखले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी केले. शब्दालय प्रकाशनाच्या सुमती लांडे व अलका शिंदे या कार्यक्रमाच्या निमंत्रक होत्या. वास्तवातील जीवनानुभवांचे चित्रण शिंदे यांनी या पुस्तकात केले आहे. काही वर्षांपूर्वी शिंदे यांनी या अनुभवांवर आधारित कार्यक्रम रंगमंचावर सादर केला होता. आता तो प्रयोग पुस्तक आणि ध्वनिफितीच्या माध्यमातून रसिकांसमोर आला आहे.
रमेश उदारे लिखित
‘फ फजितीचा’ प्रकाशित
रमेश उदारे लिखित आणि संकलित ‘फ-फजितीचा’ या पुस्तकाचे प्रकाशन दादर येथे झालेल्या एका कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते आणि अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या हस्ते झाले. आमोद प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या कार्यक्रमास प्रसिद्ध निवेदक प्रदीप भिडे, ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ, नाटय़ निर्माते प्रसाद कांबळी, पटकथा-संवाद लेखक अनिल कालेलकर आदी उपस्थित होते. नाटय़-चित्रपट अभिनेते तसेच अन्य क्षेत्रांतील मान्यवरांच्या झालेल्या फजितीचे किस्से या पुस्तकात संकलित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली केळकर यांनी केले.
चतुरंग प्रतिष्ठान आयोजित ‘मुक्तसंध्या’
‘सोशल नेटवर्किंग’ हा एक उत्तम ज्ञानमार्ग असला तरी त्याचा योग्य त्या जबाबदारीने वापर झाला पाहिजे, असे मत चतुरंग प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या ‘मुक्तसंध्या’ या कार्यक्रमात अनेक वक्त्यांनी मांडले.
दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात झालेल्या ‘रिस्पॉन्सिबल नेटिझन’ या विषयावरील परिसंवादात ‘अहान फाऊंडेशन’च्या सोनाली पाटणकर, उन्मेश जोशी, गौरांग यांनी सहभाग घेतला होता. भ्रमणध्वनी हा संपर्काचे माध्यम, तर इंटरनेट हे माहिती, तंत्रज्ञान आणि अभ्यासासाठी आहे, ही गोष्ट पालकांनी आपल्या पाल्यांच्या मनावर ठसविली पाहिजे. नाहीतर मुले चुकीच्या मार्गाने जाऊ शकतात, असे सांगून या मंडळींनी इंटरनेटचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे सोदाहरण स्पष्ट केले. इंटरनेटचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम याचाही सविस्तर ऊहापोह या वेळी करण्यात आला. सोशल नेटवर्किंगच्या विविध संकेतस्थळांवर आपली वैयक्तिक माहिती आणि छायाचित्र टाकताना योग्य ती काळजी घेतली नाही तर काय घडू शकते, याचे धोकेही त्यांनी सांगितले. ‘सायबर लॉ’च्या कलम ६६ आणि ६७ अन्वये कोणता गुन्हा कोणत्या कलमाखाली येतो, त्याची माहिती उन्मेश जोशी यांनी दिली. कार्यक्रमात या तिघांनी स्लाइड शोच्या माध्यमातून साइट हॅक करणे म्हणजे काय, मुलांनी कितव्या वर्षांनंतर इंटरनेट वापरायला सुरुवात करावी, पालकांनी त्यांच्यावर नियंत्रण कसे ठेवावे, नेट बँकिंग व क्रेडिट कार्ड वापरताना घेण्याची काळजी याचेही विस्तृत विवेचन या वेळी त्यांनी केले.
माहीम सार्वजनिक वाचनालयात
झाली ‘दीपपूजा’
आषाढ अमावास्येच्या दिवशी भारतीय संस्कृतीत दीपपूजा केली जाते. काही घरी अद्यापही या दिवशी दीपपूजा केली जाते. माहीम सार्वजनिक वाचनालयाने हा उत्सव वाचक आणि नागरिकांच्या उपस्थितीत नुकताच साजरा केला. या निमित्ताने जुन्या-नव्या दिव्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
या वेळी दिव्यांच्या विविध प्रकारांची माहिती देण्यात आली. गेली लाखो, कोटय़वधी वर्षे जगाला प्रकाश देणारा सूर्य, नाटय़ प्रयोगाच्या वेळी केली जाणारी प्रकाशयोजना, पौराणिक काळातील दिवे याची माहिती या वेळी देण्यात आली. या वेळी कणकेचे दिवे प्रसाद म्हणून वाटण्याची पद्धत आहे. प्रदर्शनाच्या निमित्ताने एका हौशी महिलेने तयार केलेले उकडीचे दिवेही प्रदर्शनात मांडण्यात आले होते.
संग्रहित लेख, दिनांक 20th Aug 2013 रोजी प्रकाशित
सयाजी शिंदे यांच्या आवाजात ‘तुंबारा’!
अभिनेते सयाजी शिंदे लिखित ‘तुंबारा’ या मुक्त छंदातील काव्य-नाटय़ पुस्तकाचे तसेच याच पुस्तकाच्या शिंदे यांच्याच आवाजातील ध्वनिफितीचे प्रकाशन वांद्रे येथील
First published on: 20-08-2013 at 09:37 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tumbara in voice of sayaji shinde