ट्वेंटी वन शुगर्स या नव्या साखर कारखान्याची मांजरा परिवारात भर पडली आहे. अहमदपूर व चाकूर तालुक्यांतील शेतकऱ्यांचे हा कारखाना आर्थिक विकासाचे केंद्र बनेल, असे प्रतिपादन आमदार दिलीपराव देशमुख यांनी केले.
अहमदपूर तालुक्यातील धानोरा येथे उभारण्यात येणाऱ्या ट्वेंटी वन शुगर्सच्या भूमिपूजन मंगळवारी झाले. गहिनीनाथमहाराज औसेकर, आमदार अमित देशमुख, बाबासाहेब पाटील व वैजनाथ िशदे, माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार बब्रुवान खंदाडे व सुरेश देशमुख, जि.प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, उपाध्यक्ष अशोक पाटील निलंगेकर, विक्रम गोजमगुंडे, मांजरा परिवारातील कारखान्यांचे अध्यक्ष, काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हय़ात १० तालुके व ११ साखर कारखाने आहेत. एका कारखान्याला ५ लाख टनांप्रमाणे जिल्हय़ात ५० लाख टन उसाची गरज आहे. ती भागविण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात ऊसलागवड करणे गरजेचे आहे. या वर्षी १०० कोटींचे कर्ज देण्याचे नियोजन जिल्हा बँकेमार्फत करण्यात आले आहे. जेथे माल पिकतो त्या परिसरात मालावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू व्हायला हवेत, या हेतूनेच या नव्या कारखान्याची सुरुवात होत असल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले.
एकविसाव्या शतकाचा वेध घेणारा कारखाना म्हणून ‘ट्वेंटी वन शुगर्स’ हे नाव असल्याचे प्रवर्तक आमदार अमित देशमुख यांनी सांगितले. पाच हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेचा हा कारखाना असून, ३८ मेगावॉट सहवीजनिर्मिती व प्रतिदिन १ लाख लिटर क्षमतेचा आसवनी प्रकल्प असेल. येत्या २१ ऑक्टोबरला ट्वेंटी वन शुगर्सचे बॉयलर प्रदीपन होणार असून, २१ नोव्हेंबरला गळिताला प्रारंभ होईल. २५ वर्षांपूर्वी लातूरमध्ये मांजरा कारखान्यामार्फत घडली तशी क्रांती आता अहमदपूरमध्ये होईल, असेही त्यांनी सांगितले. विक्रम गोजमगुंडे यांनी प्रास्ताविक केले.