निलंगा तहसील कार्यालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेश सरचिटणीस संभाजी पाटील निलंगेकर अचानक व्यासपीठावर आले व ध्वनिवर्धकाचा ताबा घेत त्यांनी भाषण केले. मात्र, या वेळी चुलते अशोक पाटील निलंगेकर यांच्याबरोबर त्यांची जुगलबंदी चांगलीच रंगली.
तहसील कार्यालयाचा भूमिपूजन कार्यक्रम सुरू असताना संभाजी निलंगेकर यांनी व्यासपीठावर येऊन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी बोलताना, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यास सत्ताधाऱ्यांचे काय हाल होतात, हे चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीतून जनतेने काँग्रेसला दाखवून दिले. राज्यातही सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. येत्या निवडणुकीत महाराष्ट्रातही काँग्रेसचे पानिपत निश्चित आहे, असा सूर त्यांनी लावला.
त्याचा समाचार घेताना अशोकराव पाटील निलंगेकर यांनी, काळे झेंडे दाखवून आंदोलन करणाऱ्यांनाही आता लोकशाही समजली आहे, असा टोला लगावला. मतदारसंघातील जनता विकास करणाऱ्यांना साथ देते, हे विविध निवडणुकांमधून दिसून आले आहे. यापुढील काळातही राज्यात काँग्रेसचेच सरकार येणार असून, निलंग्याचा आमदारही काँग्रेसचाच असेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी रंगलेल्या राजकीय जुगलबंदीला उपस्थितांनीही प्रतिसाद दिला.
सामान्य जनतेचे काम पारदर्शक व सुलभपणे करावे, अन्यथा तो चकरा मारून नाराज होऊ शकतो. प्रशासनाने सामान्य माणसाची गरसोय होऊ न देता त्याला मदत व सहकार्य करून दिलासा द्यावा, असे आवाहन मंत्री थोरात यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर होते. जि. प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, उपाध्यक्ष अशोक पाटील निलंगेकर, माजी आमदार धर्मा सोनकवडे, नगराध्यक्षा सुनीता चोपणे, पंचायत समिती सभापती नागनाथ पाटील, उपसभापती राजकुमार चिंचनसुरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे, जिल्हाधिकारी डॉ. बिपीन शर्मा यांची उपस्थिती होती. श्रीशैल्य बिराजदार व सतीश हाणेगावे यांनी सूत्रसंचालन केले. तहसीलदार नामदेव टिळेकर यांनी आभार मानले.