केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाने नवी मुंबईमध्येदेखील शोकाकुल वातावरण पाहायला मिळाले. नवी मुंबईसह पनवेल आणि उरणमध्ये व्यापाऱ्यांनी आणि रिक्षा चालकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला. मुंडे यांच्या निधनाची बातमी सकाळीच धडकल्याने शहरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते. काही वेळातच शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. तसेच शहरातील रिक्षा चालक संघटनांनी रिक्षा वाहतूक बंद केल्याने रिक्षा थांबे मोकळेच दिसत होते. त्यामुळे नेहमी वर्दळ असणाऱ्या नेरूळ, सीबीडी, सानपाडा, वाशी रेल्वे स्थानक आवारातील रिक्षा वाहतूक ठप्प झाली. वाशी, कोपरखैरणे, घणसोली, नेरूळ, ऐरोली, सीबीडी, पनवेल आणि उरण परिसरातील दुकाने बंद होती. या बंदमुळे शहरात शुकशुकाट पसरला होता.
मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दुपारी साडेबारा वाजता वाशी येथील भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या वेळी जमलेल्या अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते. तसेच त्यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेकांचे कंठ दाटून आले होते. मुंडे यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एक खंबीर आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेणारे नेतृत्व हरवले आहे. येत्या काळामध्ये त्यांचे विचार घेऊन पुढे जाणाचा प्रयत्न आम्ही करणार असल्याची भावना महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या चिटणीस वर्षां भोसले यांनी या वेळी व्यक्त केली. तळागाळापर्यंत पोहोचणाऱ्या कार्यकर्त्यांचा नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी त्यांच्या कार्यशैलीने महाराष्ट्र भाजपला लोकांमध्ये पोहोचवले आणि वाढवले. त्यांच्या अशा अचानक जाण्याने महाराष्ट्र भाजपचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. तळागाळातील तरुण कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरणार असल्याची भावना नवी मुंबई जिल्हय़ाचे माजी सरचिटणीस संतोष पाचलग यांनी व्यक्त केली. त्यानंतर हे कार्यकत्रे मुंडे यांच्या पाíथवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी नरिमन पॉइंट व तेथून बीडच्या परळी येथील गावी रवाना होणार असल्याची माहिती पाचलग यांनी दिली.