शेतकरी संघटनेचे १२ वे संयुक्त अधिवेशन ८, ९ व १० नोव्हेंबरला चंद्रपूर येथे, तर धान, सोयाबीन व कापूस परिषद २ व ३ ऑक्टोबरला पांढरकवडा व नांदेड येथे घेण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
शुभमंगल कार्यालयात शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष रवी देवांग, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, शेतकरी महिला आघाडीच्या प्रांताध्यक्ष शैला देशपांडे, युवा आघाडीचे प्रांताध्यक्ष संजय कोले, स्वभाप महिला आघाडीच्या प्रांताध्यक्ष सरोज काशीकर, अ‍ॅड. दिनेश शर्मा, बळीराज्य विदर्भ प्रमुख मधू हरणे, महिला आघाडी प्रमुख माया पाटील, सभापती नीळकंठ कोरांगे, सिंधू बारसिंगे, भीमराव पुसाम, अ‍ॅड. देवाळकर, अ‍ॅड. शरद कारेकर, प्रभाकर ढवस, देवाजी हुलके, श्रीधर बल्की, प्रल्हाद पवार, माजी नगराध्यक्ष रमेश नळे, दिनेश आकनुरवार, शारदा डाहुले, सुधीर सातपुते, नरेंद्र काकडे, बंडू कोडापे, चंद्रकला ढवस, डॉ.भूपाळ पिंपळशेंडे, रवी गोखरे, यादव चटप, संध्या सोयाम, नीमा काळे, सतीश सावकार यांच्या प्रमुख उपस्थित बैठक झाली.
या बैठकीत ८, ९ व १० नोव्हेंबर २०१३ मध्ये होणारे संयुक्त अधिवेशन, वेगळ्या विदर्भ राज्याचे आंदोलन, जिल्ह्य़ात व विदर्भात सतत पावसामुळे झालेला ओला दुष्काळ, दुष्काळामुळे वीज व कर्जमाफीची मागणी, केंद्र सरकारचा शेतकरीविरोधी नवा सिलिंग कायदा, अन्नसुरक्षा विधेयक या प्रमुख विषयांवर चर्चा करण्यात आली. विदर्भातील अतिवृष्टी, नद्या-नाल्याला आलेले महापूर, त्यामुळे खरडल्या गेलेल्या जमिनी, पिकांचे झालेले नुकसान, नष्ट होत चाललेली उभी पिके, आधीच पॅकेजनंतरही विदर्भात बंद न झालेले आत्महत्यांचे सत्र, कापूस भावात केलेली किरकोळ वाढ या बाबींना प्राधान्य देऊन जिल्हा प्रमुख पूरग्रस्त भागाचा दौरा करतील. सरकारने तातडीने या सर्व पूरग्रस्त भागाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश जारी करावे व कापूस, सोयाबीन, धान व तुरीला एकरी १० हजार रुपये रोखीने मदत द्यावी व सर्व शेतकऱ्यांकडील थकित कर्ज व वीजबिल माफ करावे, अशा मागण्या या बैठकीत लावून धरण्यात आल्या. यावेळी बाराव्या शेतकरी संघटना संयुक्त अधिवेशन कार्यालयाचे व अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रांताध्यक्ष संजय कोल्हे यांच्या हस्ते झाले. बैठकीला शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.