इचलकरंजी येथील मुख्य मार्गावरील सन्मती सहकारी बँक फोडण्याचा प्रकार अयशस्वी ठरला. चोरटय़ांनी बँकेची पाच ठिकाणची कुलपे तोडूनही त्यांच्या हाती काहीच लागले नाही. पोलिसांनी याप्रकरणी एका बाल गुन्हेगारासह तिघांना अटक केली आहे. दीपक शिवाजी भोसले (वय २२ रा.लालनगर), दीपक चंदर शिंदे (वय २३ रा.तासगाव, जि.सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांच्याकडून बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
इचलकरंजीतील महात्मा गांधी पुतळ्याजवळ सन्मती सहकारी बँकेचे मुख्यालय आहे. शुक्रवारी रात्री चोरटय़ांनी बँकेच्या मुख्य लोखंडी दरवाजाचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. वरच्या मजल्यावरील लोखंडी दरवाजा व लाकडी दरवाजा तसेच दर्शनी भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायरी उचकटून टाकल्या. स्ट्राँगरूमकडे जाणारी दोन कुलपे तोडून आत प्रवेश केला. बनावट चावीने लोखंडी लॉकर उघडण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला.
बँकेसमोर राहणाऱ्या एका दुकानदारास चोरीचा सुगावा लागल्यावर त्याने बँकेचे जागामालक राजकुमार बेगावकर यांना कल्पना दिली. बेगावकर यांनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांच्याशी संपर्क साधला. पाटील यांनी बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रीय काँग्रेसचे पक्षप्रतोद सुनिल पाटील यांना याची माहिती दिली. अध्यक्ष पाटील यांनी गावभाग पोलीस ठाण्याशी संपर्क साधल्यावर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तथापि चोरटे तेथून पसार झाले होते.
दरम्यान पोलिसांची रात्रीची गस्त सुरू असताना खंजिरे मळ्याजवळ दीपक भोसले, दीपक शिंदे व एक अल्पवयीन मुलगा संशयास्पदरीत्या फिरतांना आढळले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर सन्मती बँकेत चोरीचा प्रयत्न केल्याची माहिती दिली. या चोरटय़ांनी सुंदर बाग व स्टेशन रोडवरील वीज मंडळाचे कार्यालय, सुरज गॅस एजन्सी, आझाद चित्र मंदिराजवळील भांडी दुकान येथे चोरी केल्याची कबुली गावभाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामदास इंगवले यांना दिली. शनिवारी सकाळी श्वानपथक व ठसे तज्ज्ञ बँकेत तपासणीसाठी आले होते. श्वानपथकाने खंजिरे मळ्यापर्यंत मार्ग काढला. बँकेच्या सुरक्षेसाठी असणारे सायरन बंद असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी बँकेच्या सुरक्षेसाठी पहारेकरी नेमावा, सायरन बसवावेत, नाईट व्हिजन कॅमेरे बसवावेत,अशा सूचना बँकांना दिल्या आहेत. मात्र काही बँका त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. बँकांनी सुरक्षेबाबत दक्षता राखावी, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक प्रकाश देशमुख यांनी केले आहे.