राज्यात विजेचा तुटवडा असून उन्हाळ्यात मुंबईवगळता सर्वत्र वीजटंचाईच्या झळा लागणार असल्याने महावितरणकडून सर्वत्र वीज बचतीचे धडे दिले जात असताना नवी मुंबईत मात्र चौकाचौकात लागलेल्या हायमास्टच्या अनावश्यक झगमगाटाने डोळे दिपून जाण्याची वेळ आली आहे. ‘आले नगरसेवकांच्या मना तेथे पालिकेचे काहीही चालेना’ अशी नवी मुंबईत पद्धत असल्याने पालिकेला त्याच्यावर अंमलबजावणी करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच नवी मुंबईत दिवे कमी आणि हायमास्ट जास्त लागले असून जागोजागी २५० पेक्षा जास्त हायमास्ट उभे राहिले आहेत. त्यांच्या उभारणीवर आणि वीज बिलावर करोडो रुपये खर्च होत असून या उधळपट्टीला चाप लावण्याचे पालिका प्रशासनाने ठरविले आहे. त्याचा पहिला फटका वाशी येथील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला बसला आहे. चौकात किती प्रकाश हवा आहे, याची खातरजमा केल्याशिवाय आता हायमास्ट लावता येणार नाहीत.
नवी मुंबईच्या लोकसंख्येने जानेवारी २०१२ रोजीच्या जनगणनेनुसार आता कुठे बारा लाखांचा आकडा पार केला आहे. गेल्या जनगणनेनुसार असलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत केवळ ९० प्रभाग पाडण्यात आले होते. त्यामुळे मार्च २०१५ मध्ये होणाऱ्या पालिका निवडणुकीत प्रभागांची संख्या खूप मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. जेमतेम ९० प्रभागसंख्या असलेल्या नवी मुंबईत नगरसेवकांच्या मागणीनुसार आत्ताच २५० हायमास्ट लावण्यात आले आहेत.  सुमारे १६ मीटर उंच असणाऱ्या एका हायमास्टवर पाच लाख रुपये खर्च होत असल्याने गेल्या १५ वर्षांत हायमास्टवर बारा कोटी रुपये खर्च झाले असून त्यांच्या वीज बिलापोटी महिन्याला येणाऱ्या दोन कोटी रुपये खर्चाला चाप लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या हायमास्ट उभारणीतून मिळणाऱ्या टक्केवारीसाठी हे हायमास्ट नावाचे नवीन प्रकरण पालिकेत तेजीत असून कंत्राटदाराकडून दहा टक्के टक्केवारी स्थानिक नगरसेवकाला हायमास्ट उभा राहण्यापूर्वी मिळत असल्याने नगरसेवक त्यासाठी हट्ट धरतात. त्यामुळे टक्केवारीच्या या कुरणावर करवत चालवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून त्याचा पहिला फटका वाशीतील राष्ट्रवादीच्या हनुमान नगरसेवकाला बसला आहे. हायमास्ट बसविण्याचे कोणतेही निकष यापूर्वी लावले जात नसल्याचे दिसू आले आहे. या कामामुळे विद्युत विभागाचेही चांगभलं होत असून अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर हायमास्टचा प्रकाश झळाळत असल्याचे चित्र आहे. सर्वसाधारणपणे वाचणासाठी २०० लक्स (लक्स हे प्रकाश मोजण्याचे यंत्र आहे) प्रकाश लागतो तर रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या पादचाऱ्यांना किंवा वाहनचालकांना १५ ते २० लक्स प्रकाश पुरेसा आहे. पण नवी मुंबईतील हायमास्टचा लखलखाट तर आजूबाजूच्या परिसरात दिवाळी साजरी करणार आहे. त्यामुळे पालिकेला बिलापोटीच दोन करोड रुपये भरावे लागत आहेत. शहरातील सर्व रस्त्यांवरील दिवाबत्तीवर पालिका १६ कोटी रुपये खर्च करीत आहे. त्यामुळे या अनावश्यक खर्चाला चाप लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याने नगरसेवक आणि प्रशासनाचे यापुढे खटके उडणार हे जवळ जवळ निश्चित आहे.