पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, काही राजकीय आणि सामाजिक संघटनांचा विरोध झुगारून विदर्भातील विविध भागात तरुणाईने ‘व्हॅलेंटाईन डे’ उत्साहात साजरा केला. शहरातील विविध महाविद्यालयात यानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
‘व्हॅलेंटाईन डे’ला दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेना, मनसे, बजरंग दल, भाजयुमो आणि विश्व हिंदू परिषदेने विरोध केला होता. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने गुरुवारी शहरात ‘इशारा’ मिरवणूक काढून ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करणाऱ्यांना एक प्रकारे इशाराच दिला होता. मात्र, तरीही शहरातील विविध महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी  ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला.
बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने दिलेल्या इशाऱ्यामुळे सार्वजनिक ठिकाणी ऐरवी दिसणारी महाविद्यालयीन जोडपी यंदा मात्र दिसली नाही.  शहरातील विविध उद्यानात आणि तलावाच्या ठिकाणी युवक युवती दिसून आले मात्र दुपारच्या वेळी फारशी हुल्लडबाजी दिसून आली नाही. फुटाळा तलावाजवळ कुठेतरी आडोशाला जाऊन काही युवक युवती ‘छुपके छुपके’ परस्परांना गुलाबाचे फूल देऊन शुभेच्छा देत होते. शहरातील विविध महाविद्यालयासमोर गुलाबाचे फूल विकणारे दिसून आले. एरवी ५ ते १० रुपयाला मिळणारे गुलाबाचे फूल २५ ते ५० रुपयाला मिळत होते. या शिवाय अनेक युवकांनी आणि युवतींना भेट वस्तू दिल्या. युवकांची हुल्लडबाजी टाळण्यासाठी वेस्ट हायकोर्ट रोड, फुटाळा तलाव, वनस्पती उद्यान, शंकरनगर या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यामुळे दुपारच्यावेळी परिसरात शांतता होती. मात्र सायंकाळनंतर युवक युवतींची गर्दी वाढू लागली.  
 तेलंगखेडी तलाव परिसर, वेस्ट हायकोर्ट रोड, चिल्ड्रेन्स पार्क  चौक, पूनम चेंबर्स, वर्धमाननगरातील पूनम चेंबर्स, व्हेरायटी चौकमधील सिनेमॅक्स या ठिकाणी सायंकाळच्यावेळी तरुणाईच्या उत्साहाला उधान आले होते. शहरातील काही महाविद्यालयासमोर विरोध करणाऱ्या संघटनाचे कार्यकर्ते उभे असल्याचे लक्षात येताच अनेकांनी तलावाच्या ठिकाणी किंवा उद्यानात जाऊन व्हॅलेंटाईन डे साजरा केला. महाविद्यालयीन तरुणींनी आज परस्परांना शुभेच्छा दिल्या, पण चुपके-चुपके. गेल्या काही दिवसांपासून या दिवसाच्या तयारीला लागलेले तरुण-तरुणी आज मोबाईलद्वारे व प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देत होते. शहरातील विविध युवक युवतीच्या वसतिगृहात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला.
एकीकडे शहरातील विविध भागात मोठय़ा युवकांची हुल्लडबाजी सुरू असताना दुसरीकडे मात्र काही सामाजिक संघटनांनी प्रेमाचा संदेश देऊन हा दिवस सादरा केला. शहरातील काही शाळांमध्ये शिक्षकांना गुलाबाचे फूल देऊन हा दिवस साजरा केला. शहरातील मानेवाडा भागातील एका अपंग मुलांच्या शाळेत अपंग विद्याथ्यार्ंनी एकमेकांना आणि शिक्षकांना गुलाबाचे फूल देऊन हा दिवस साजरा केला.