‘व्हॅलेंटाईन डे’ केवळ महाविद्यालयीन तरुण-तरुणींसाठीच नव्हे तर सामान्य माणसेही मोठय़ा संख्येने साजरा करून पत्नीला भेटवस्तू देण्याचा कल गेल्या काही वर्षांपासून नागपुरात रुजला आहे. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच जात असून त्यात काहीही गैर नसल्याचे रस्तोरस्ती सजलेल्या फुलांच्या दुकानांवरून दिसून येते.
व्हॅलेंटाईन म्हणजेच प्रिय व्यक्ती. या दिवशी युवावर्गात संचारणारा उत्साह, धुंदी, चंगळ, बेपर्वाई अधोरेखित होते. व्हॅलेंटाईन डे म्हणजे काहीतरी वाईट, असभ्य, अश्लिल असे काहींना वाटत असले तरी हा दिवस युवावर्गातच नव्हे तर सामान्य माणसांमध्येही लोकप्रिय झाला आहे. म्हणूनच गुलाब पुष्पांच्या दुकानात लाल, आकर्षक, मनमोहक गुलाबांची रेलचेल दिसते ती केवळ युवावर्गासाठी नाही तर सामान्यांसाठीही आहे. उद्या, १४ फेब्रुवारीला आपल्या प्रिय व्यक्तीस गुलाब पुष्प, पुष्पगुच्छ, लोकर व प्लास्टिकने बनवलेले हृदय दुकानात विक्रीस उपलब्ध करण्यात आले आहे. लाल रंगाचे हृदय १५० रुपयांपासून ते ६०० रुपयांपर्यंत असून रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष ही दुकाने वेधून घेत आहेत. तर गुलाब पुष्पाची किंमत २० रुपये आहे.
गेल्या आठवडय़ात गुलाब पुष्पाची किंमत १० रुपये होती. ती शुक्रवारी २० तर उद्या, शनिवारी ४० रुपयांपर्यंत जाईल, असे सांगितले जाते. उद्या, सायंकाळी गुलाबाची कांडी ४० रुपयांना मिळेल, अशी माहिती अजनी रेल्वे आरक्षण केंद्रासमोरील सोनू फ्लावर्सचे मालक गोपाल चव्हाण यांनी सांगितले. दुपारी दुकानात गर्दी नसली तरी सायंकाळी आणि ‘व्हॅलेंटाईन डे’ला गुलाबपुष्प घेणाऱ्यांची संख्या वाढते, असा त्यांचा अनुभव आहे. अनेक पुरुष पत्नीला गुलाबपुष्प देऊन हा दिवस साजरा करतात. नागपुरातील फुले मार्केटमध्ये बंगळुरू आणि पुण्याहून आलेली फुले विशेष आकर्षक आहेत. पाकळ्या कित्येक दिवस ताज्या दिसतात. स्थानिक गुलाब मात्र, लवकरच सुकतो आणि पाकळ्या गळू लागतात, असे चव्हाण म्हणाले.
‘व्हॅलेंटाईन डे’ला आता अधिकाधिक रंग चढू लागला असून रस्त्यांवर तरुण गाडय़ांवर जल्लोष करीत आहेत. चौकाचौकात पोलीस अशा तरुणांना टिपत त्यांच्याकडून चालान भरून घेत आहेत तर काही ठिकाणी त्यांना दरडावून ताकीदही दिली जात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Feb 2015 रोजी प्रकाशित
सामान्यांमध्ये लोकप्रिय दिवस, मनमोहक गुलाबांची रेलचेल
‘व्हॅलेंटाईन डे’ केवळ महाविद्यालयीन तरुण-तरुणींसाठीच नव्हे तर सामान्य माणसेही मोठय़ा संख्येने साजरा करून पत्नीला भेटवस्तू देण्याचा कल गेल्या काही वर्षांपासून नागपुरात रुजला आहे.
First published on: 14-02-2015 at 02:02 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Valentine day get popular in common people