तुम्ही शाळेत वेळेवर येता का..वाचन करता का..शिक्षणहे नेमके काय आहे.. तुम्ही भान ठेवून शिकविता की बेभान होऊन..नोकरीनंतर भ्रमणध्वनी बदलले का.. नेहमी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची सवय झालेल्या शिक्षकांना जेव्हां असे एका पाठोपाठ एक अडचणीत सापडविणारे प्रश्न विचारले जाऊ लागले, तेव्हां त्यांची भंबेरीच उडाली. कारण, प्रश्नांची सरबत्ती करणारी व्यक्ती कोणी साधीसुधी नव्हती. तर, दरस्तूरखुद्द विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी ही ‘मास्तरांची शाळा’ घेतली.
शिक्षक दिनाच्या दिवशीच पुरके यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची वेळ येण्यास निमित्त ठरले ते आदिवासी विकास विभागातर्फे शिक्षक दिनानिमित्त आयोजित आश्रमशाळांमधील शिक्षक व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे.
महाकवी कालिदास कलामंदिर येथे झालेल्या कार्यक्रमास आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, पालकमंत्री छगन भुजबळ, आ. ए. टी. पवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयश्री पवार आदी उपस्थित होते. नाशिक व ठाणे विभागातील आश्रमशाळांमधील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन, तसेच आश्रमशाळांतील शिक्षक व विशेष प्रोत्साहनपर पारितोषिक योजनेंतर्गत आश्रमशाळांना सन्मानित करण्यात आले.
शिक्षकांची शाळा भरविताना पुरके यांनी वेगवेगळ्या मुद्यांवरून टोलेबाजी केली. शिक्षण हा नेमका बिझनेस आहे की व्यवसाय, या त्यांच्या प्रश्नावर काही शिक्षकांनी ‘पेशा’ असे उत्तर दिले. परंतु, त्यांनी हे उत्तर चुकीचे ठरवित शिक्षण हे व्रत असल्याचे सांगितले. शिक्षकांनी शाळेत वेळेवर येणे तसेच वाचन करणे आवश्यक आहे. काही पुस्तकांची नांवे सांगून त्यांनी त्यांचे वाचन करण्याचा सल्ला दिला. भान ठेवून शिकविता की बेभान होऊन, या प्रश्नावर शिक्षकांचे मत जाणून घेतल्यानंतर त्यांनी बेभान होऊन शिकविण्याचा सल्ला देत ‘होशवालोंको खबर क्या.’ या गजलचा संदर्भ देत तिचा अर्थ उलगडून दाखविला. पुरके यांच्याकडून अशी गुगली टाकली जाईल याची शिक्षकांना कल्पना नव्हती. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर सभागृहात वेगवेगळी उत्तरे दिली जात होती. त्यातील काही उत्तरे चुकीची ठरवित पुरके यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.
शिक्षण खात्याची जबाबदारी सांभाळणे अवघड असते. या विभागाची मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्र्यांनी किमान एक महिना तरी धुरा सांभाळायला हवी. त्यावेळी त्यांना या विभागात काम करताना येणाऱ्या अडचणींची जाणीव होईल, खाचखळगे समजतील, असेही पुरके यांनी नमूद केले. आपल्यासह अनेकांना मुख्यमंत्री बनण्याची स्वप्ने पडत असतात. आदिवासी विकास विभागाचे मंत्रीपद मधुकर पिचड यांना आधीच द्यावयास हवे होते. कबड्डीचा संघ डळमळीत झाल्यावर पिचडांवर ही जबाबदारी सोपविली गेली. त्यांनी जबाबदारी सांभाळल्यानंतर हा विभाग चांगले काम करू लागल्याचे प्रशस्तीपत्रकही पुरके यांनी दिले.
पिचड यांनी आदिवासी विकास विभागातील शिक्षण व पोषण आहार विभाग वेगवेगळा करण्याचे जाहीर केले. पोषण आहाराच्या मुद्यावरून आश्रमशाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक वेठीस धरले जातात. ही बाब लक्षात घेऊन हे दोन्ही विभाग स्वतंत्र करण्याच्या दृष्टिने पावले टाकली जात असल्याचे दिसून आले. यावेळी ते प्रसारमाध्यमांवरही घसरले. आदिवासी विकास विभागाच्या १२२ आश्रमशाळांचा १०० टक्के निकाल लागला. प्रसारमाध्यमे या कामगिरीकडे लक्ष देत नसल्याची तक्रार त्यांनी केली.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्यावतीने परशुराम साईखेडकर नाटय़गृहात आयोजित सोहळ्यात एकूण १४ जणांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पालकमंत्री छगन भुजबळ, जि. प. अध्यक्षा जयश्री पवार, उपाध्यक्ष संपत सकाळे आदी
उपस्थित होते. सुशिक्षित विद्यार्थी घडविण्याबरोबर संस्कारीत विद्यार्थी घडविणे आवश्यक आहे.
स्त्री भ्रृणहत्येसारखे पाप करणाऱ्यांना संस्कारीत म्हणत नाही, असे भुजबळ यांनी नमूद केले. शिक्षक देशाचे भवितव्य घडविण्याचे काम करतात. आधुनिक युगात तंत्रज्ञानासोबत नीतीमूल्ये किती महत्वाची असतात, याची जाणीव शाळेतच करून देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यावेळी सोपान खैरनार, संजय खांगळ, सुनील पवार, मंगला पारधी, जनार्दन कडवे, नीलेश भामरे, रमेश बच्छाव, विद्या पाटील, श्रीराम आहेर, प्रदीप शिंदे, मनोहर जाधव, मारूती आव्हाड, पुष्पावती मुसळे व नानासाहेब कु ऱ्हाडे यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 6th Sep 2013 रोजी प्रकाशित
वसंत पुरके यांची ‘मास्तरांची शाळा’
शिक्षक दिनाच्या दिवशीच पुरके यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची वेळ येण्यास निमित्त ठरले ते आदिवासी विकास विभागातर्फे शिक्षक दिनानिमित्त आयोजित आश्रमशाळांमधील शिक्षक व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे.

First published on: 06-09-2013 at 08:03 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasant purke school