सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरला बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ मेडिकल, मेयोसह विदर्भातील संपूर्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टर्स उद्या, गुरुवारपासून बेमुदत संपावर जात आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार निवासी डॉक्टरांनी केला आहे. या संपामुळे विदर्भातील शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडणार आहे. दरम्यान, या घटनेचा निषेध म्हणून बुधवारी मेडिकल, मेयोसह विदर्भातील शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी काळ्या फिती लावून काम केले.
सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मंगळवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास एका निवासी डॉक्टरला तेथील पोलीस उपनिरीक्षकांनी बेदम मारहाण केली. या पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करावे, त्याला अटक करून त्याच्यावर कारवाई करावी, सर्व शासकीय रुग्णालयात निवासी डॉक्टरांना सुरक्षा प्रदान करावी, या प्रमुख मागण्यांसाठी केंद्रीय निवासी डॉक्टरांच्या संघटनेने उद्या, गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून बेमुदत संपावर जाण्याची घोषणा केली आहे. या घोषणेला नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) मार्ड संघटनेने पाठिंबा दर्शवून संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या संपात मेडिकलमधील ३५० तर मेयोतील १८० निवासी डॉक्टर संपावर जाणार आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत हा संप सुरूच राहणार असल्याचे मेडिकलमधील मार्डचे अध्यक्ष डॉ. मयुर जाधव आणि मेयोतील मार्डचे अध्यक्ष डॉ. बालाजी बस्ते यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
निवासी डॉक्टर आरोग्य सेवेचा कणा समजला जातो. संपामुळे संपूर्ण आरोग्य सेवा कोलमडणार आहे. या संपाच्या पाश्र्वभूमीवर चर्चा करण्यासाठी बुधवारी दुपारी मेडिकल आणि मेयोमध्ये अधिष्ठात्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीत संपाद्वारे येणाऱ्या अडचणींवर साधक बाधक चर्चा झाली. त्यात नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचे ठरवण्यात आले. निवासी डॉक्टरांच्या ऐवजी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, प्राध्यापक व एम.बी.बी.एस.च्या विद्यार्थ्यांना वार्डात कर्तव्यावर पाठवले जाणार आहे. याशिवाय ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्याचा निर्णय घेण्यात आला. संपकाळात फक्त अत्यावश्यक आरोग्य सेवेलाच प्राधान्य दिले जाणार आहे. या काळात अत्यावश्यक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jan 2014 रोजी प्रकाशित
विदर्भातील निवासी डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर
सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरला बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ मेडिकल, मेयोसह विदर्भातील

First published on: 02-01-2014 at 09:52 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidarbha residencial doctors on strike from today