शहर काँग्रेसध्यक्षपद
शहर काँग्रेसमध्ये नेतृत्त्व बदलाचे वारे वाहू लागले असून विद्यमान शहराध्यक्ष जयप्रकाश गुप्ता यांच्या जागी महापालिकेतील विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांना नियुक्त करण्याचा काँग्रेसश्रेष्ठींचा निर्णय आता जवळजवळ पक्का झाल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली. विद्यमान शहराध्यक्ष जयप्रकाश गुप्ता यांच्याविरुद्ध खदखदणारा असंतोष आणि निष्क्रियतेचा फटका बसल्याची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे. विकास ठाकरे यांच्याकडे महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद कायम राहण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तविली. याबाबत अद्याप संभ्रमाची स्थिती असल्याने त्यांच्या नावाची घोषणा लांबणीवर पडली आहे.
जयप्रकाश गुप्ता यांचा कार्यकाळ गेल्याच महिन्यात संपला. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता शहर काँग्रेसला आक्रमक आणि जनतेत वावरणाऱ्या तरुण नेतृत्त्वाची आवश्यकता असल्याचे कारण पुढे करून ठाकरे यांचे ‘गॉडफादर’ खासदार विलास मुत्तेमवार यांनी मोर्चेबांधणी केली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता दृष्टिपथात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनीही विकास ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. फक्त त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा तेवढी
बाकी आहे.