प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संपतराव वाळुंज, उपप्राचार्य डॉ. जयसिंगराव भोर, तसेच डॉ. आर. जे. रसाळ यांनी इंडोनेशियात नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत आपले शोधनिबंध सादर केले.
इंडोनेशिया विद्यापीठाने राजधानी जकार्तात ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. भारतसह ऑस्ट्रेलिया, मलेशिया, जपान, पाकिस्तान आदी प्रमुख देशांसह विविध १५ देशांतील सुमारे दोनशे तज्ञ प्राध्यापक परिषदेत सहभागी झाले होते. डॉ. संपतराव वाळुंज यांनी फिनान्शियल इन्क्लुजन या विषयावर, तर प्रा. डॉ. जयसिंगराव भोर यांनी भारतातील अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक या विषयावर शोधनिबंध सादर केले. प्राचार्य वाळुंज यांना या परिषदेतील एका सत्रासाठी अध्यक्ष म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली. याचदरम्यान इंडोनेशियातीलच ब्राव्हीजया या विद्यापीठाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. आर. जे. रसाळ यांनी भारतातील बँकिंग पद्धती या विषयावर शोधनिबंध सादर केला. या सहभागाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब विखे, उपाध्यक्ष एम. एम. पुलाटे, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जि. प.च्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे  आदींनी  त्यांचे अभिनंदन केले.